हिमाचलच्या कुल्लूमध्ये पॅराग्लायडर कोसळला, पायलटसह 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:51 PM2022-06-15T18:51:09+5:302022-06-15T18:51:48+5:30
Kullu Paraglider Crash: कुल्लू जिल्ह्यातील डोभी येथे हा अपघात झाला असून, यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
कुल्लू: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी येथे आज(बुधवार) पॅराग्लायडरचा अपघात झाला असून त्यात दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 24 वर्षीय पॅराग्लायडर पायलट कृष्ण गोपाल आणि पर्यटक आदित्य शर्मा (20, अंबाला कॅंट) यांचा समावेश आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
अपघातग्रस्त पॅराग्लायडरमध्ये पर्यटक आणि पायलट दोघांचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात गंभीर जखमी झालेल्या पायलट किशन गोपालला उपचारासाठी कुलूच्या प्रादेशिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत पर्यटकाचे नाव आदित्य असून तो हरियाणातील अंबाला येथील रहिवासी आहे.
बीर बिलिंग व्हॅलीमध्ये अशीच एक घटना घडली होती
हिमाचल प्रदेशातील पॅराग्लायडिंगसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग खोऱ्यात अपघात थांबत नाहीयेत. मंगळवारी बिलिंगच्या टेक ऑफ साईटवर भीषण अपघात झाला होता. त्यात दोन जणांना जीव गमवावा लागला, तर पायलट गंभीर जखमी असून, तांडा मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.