रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:10 PM2021-03-22T18:10:59+5:302021-03-22T18:14:41+5:30
Param Bir Singh Letter: परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा संदर्भ दिला आहे.
नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती, असा संदर्भ दिल्याचे सांगितले जात आहे. (param bir singh claimed that rashmi shukla also complained against anil deshmukh)
परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात १३० पानांची रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात दुसरा मोठा दावा केला आहे. तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली होती, असे परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, परमबीर सिंग यांनी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप
पुरावे नष्ट होण्यापूर्वी सतत्या तपासणे आवश्यक
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीची निःपक्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी या प्रकरणी सतत्या तपासणे आवश्यक आहे. पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी
रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आले
रश्मी शुक्ला, ज्या त्यावेळी राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनी पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यावेळी या प्रकरणी अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करून पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असेही परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. या पत्रामुळे देशभरात खळबळ उडाली असून, भाजपसह अनेक पक्षांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आग्रही मागणी केली आहे.