तंदूर प्रकरणात शर्मा याला पॅरोल
By Admin | Published: September 16, 2015 01:53 AM2015-09-16T01:53:06+5:302015-09-16T01:53:06+5:30
खळबळजनक तंदूर हत्याकांडातील आरोपी युवक काँग्रेसचा माजी नेता सुशील शर्मा याला २० वर्षे कारागृहात घालविल्यानंतर मंगळवारी पॅरोलवर मुक्त करण्याचा आदेश दिल्ली
नवी दिल्ली : खळबळजनक तंदूर हत्याकांडातील आरोपी युवक काँग्रेसचा माजी नेता सुशील शर्मा याला २० वर्षे कारागृहात घालविल्यानंतर मंगळवारी पॅरोलवर मुक्त करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. शर्मा याने पत्नी नैना साहनी हिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तंदूरच्या भट्टीत जाळला होता. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या हत्याकांडाने देश ढवळून निघाला होता.
शर्माने शिक्षामाफी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज सादर केला असून सक्षम प्राधिकरणाकडून त्यावर विचार होईपर्यंत त्याला पॅरोलवर कारागृहाबाहेर राहता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीने २० वर्षे कारागृहात काढली असल्यामुळे संचित रजेवर (पॅरोल)मुक्त होण्याचा त्याला अधिकार आहे, असे न्या. सिद्धार्थ मृदुल यांनी स्पष्ट केले. त्यांनी शर्माला पॅरोलवर मुक्त करताना कोणत्याही अटी घातल्या नाहीत.
कनिष्ठ न्यायालयाने २००३ मध्ये शर्माला फाशीची शिक्षा ठोठावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने २००७ मध्ये हा निर्णय योग्य ठरविला होता. सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ रोजी ही शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती. हे हत्याकांड म्हणजे पत्नी नैना साहनी हिच्यासोबतचे संबंध ताणले गेल्याची परिणती होती. आरोपी शर्मा याने दहा वर्षे फाशी सेलमध्ये काढले असून तो सराईत गुन्हेगार नाही, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्याला ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेपैकी उर्वरित वर्षाची शिक्षा माफ केली जाऊ शकते, असेही सूचित केले होते. तपास प्रक्रियेत तिचा जाळलेला मृतदेह दाखविण्यात आला होता तेव्हा तो रडला होता, याचा अर्थ त्याला मुळीच पश्चात्ताप झाला नाही, असे मानता येत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)