परमबीरसिंह चंडीगडमध्ये ‘प्रकटले’; वृत्तवाहिनीला दिली माहिती, चौकशीला सामोरे जाण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 06:36 AM2021-11-25T06:36:35+5:302021-11-25T06:46:54+5:30
शरण येणार का, असाही प्रश्न केला असता याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंह बुधवारी सायंकाळी टेलिग्राम सोशल मीडिया ॲपवर आले. मात्र, काही वेळाने त्यांनी पुन्हा अकाउंट डिलिट केले.
चंदीगड/मुंबई : खंडणी प्रकरणांत गुन्हा नोंदविण्यात आलेले व गेल्या मे महिन्यापासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचा ठावठिकाणा अखेरीस लागला. आपण चंडीगडमध्ये असल्याचे त्यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीकडे स्पष्ट केले. परमबीर यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्याविरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे परमबीर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर यांनी
कोर्टात वकिलामार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिले.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख अनिल देशमुख यांच्यावर परमबीरसिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ते मे महिन्यात रजेवर गेले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा नव्हता. त्यांच्याविरोधात अनेकदा समन्स बजावल्यानंतर मुंबईतील कोर्टाने गेल्या आठवड्यात त्यांना फरारी घोषित केले. त्यामुळे परमबीर यांना सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी लागली.
टेलिग्रामवर सक्रिय झाले पण...
शरण येणार का, असाही प्रश्न केला असता याबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंह बुधवारी सायंकाळी टेलिग्राम सोशल मीडिया ॲपवर आले. मात्र, काही वेळाने त्यांनी पुन्हा अकाउंट डिलिट केले.