पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पोहोचविले पार्सल; भारतीय टपाल खात्याचा अभिनव प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 06:57 AM2022-05-30T06:57:23+5:302022-05-30T06:57:34+5:30
भूज तालुक्यातील हाबय गावातून औषधांचे पार्सल घेऊन ड्रोनने भचाऊ तालुक्यातील नेर गावाच्या दिशेने उड्डाण केले.
अहमदाबाद : ‘कबुतर जा जा’ असे म्हणत त्याच्याकरवी आपल्या जवळच्या व्यक्तींनी पत्र, संदेश पोहोचविण्याची प्रथा फार जुनी आहे. सध्या ई-मेलच्या जमान्यातही विमानाने टपाल, पार्सलची ने-आण होते, पण देशातील टपाल खात्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पार्सल पोहोचविण्याचा प्रयोग झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात ड्रोनने ४५ कि.मी.चे अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करून पार्सल योग्य ठिकाणी नेऊन दिले.
भूज तालुक्यातील हाबय गावातून औषधांचे पार्सल घेऊन ड्रोनने भचाऊ तालुक्यातील नेर गावाच्या दिशेने उड्डाण केले. त्या गावात ठरलेल्या ठिकाणी ड्रोनने उतरून पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविले. टपाल खात्याने म्हटले आहे की, देशामध्ये भविष्यात ड्रोनच्या साहाय्याने टपालाची ने-आण करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून गुजरातमध्ये केलेला प्रयोग यशस्वी ठरला. पार्सल ड्रोनद्वारे पोहोचविण्याचा प्रयोग पार पडला. शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढला पाहिजे, असे या महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. या महोत्सवात विविध प्रकारची ड्रोन लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
ड्रोनमुळे टपाल सेवेत होतील मोठे बदल
ड्रोनद्वारे पार्सल, पत्रे पोहोचविण्यासाठी विशिष्ट अंतराकरिता किती खर्च येतो याचा अभ्यास गुजरातमध्ये यासंदर्भात झालेल्या प्रयोगात करण्यात आला. ड्रोनद्वारे येणारे पार्सल ताब्यात घेण्यासाठी टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने परस्परांशी संपर्क राखावा व इतर समस्यांवर देखील यावेळी सखोल विचार करण्यात आला. ड्रोनने पत्र, पार्सल पोहोचविण्याचा प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला तर आगामी काळात टपाल सेवेत खूप मोठे बदल होणार आहेत.