जुळ्या मुलांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू; जिल्हा प्रशासनाकडून मुलांच्या नावे प्रत्येकी 10 लाखांची एफडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 14:56 IST2022-05-25T14:52:34+5:302022-05-25T14:56:32+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे.

जुळ्या मुलांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू; जिल्हा प्रशासनाकडून मुलांच्या नावे प्रत्येकी 10 लाखांची एफडी
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,124 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,507 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे.
पंजाबच्या कपूरथलामध्ये कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीत 583 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये जुळ्या मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र हरवलं आहे. त्यांची काळजी घेणारं कोणी नाही. यानंतर आता या मुलांना मदत करण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी 10 लाख रुपयांची एफडी करण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही मुलांना सरकारी संस्थांकडून मोफत शिक्षण आणि मोफत उपचारही दिले जाणार आहेत.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या दोन मुलांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची एफडी करण्यात आली आहे. जिल्हा बालकल्याण समितीच्या बैठकीला संबोधित करताना, एडीसी अनुपम क्लेर म्हणाले की, कोरोनामुळे कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाल्यामुळे 8 कुटुंबांना प्रति कुटुंब 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्य़ात कोविडमुळे ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत त्यांचा डेटा स्वराज पोर्टलवर अपलोड करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. अशा मुलांना कायदेशीर मदतही देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.