आई-बाबा, फोन दूर ठेवा ना! तुमच्याशी बोलायचे आहे; स्मार्टफोन अन् सोशल मीडियामुळे वाढतोय दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 08:43 IST2024-12-07T08:42:47+5:302024-12-07T08:43:09+5:30
सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.

आई-बाबा, फोन दूर ठेवा ना! तुमच्याशी बोलायचे आहे; स्मार्टफोन अन् सोशल मीडियामुळे वाढतोय दुरावा
नवी दिल्ली: स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होत आहे. कुटुंबामध्ये सोशल मीडियाची ढवळाढवळ प्रचंड वाढली असून, लहान मुलांचे भावविश्व त्यामुळे पार उद्ध्वस्त होत आहे. आई-वडिलांच्या फोनमध्ये तुम्हाला काय हवे, असे या मुलांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे आत्मपरीक्षण करायला लावणारी होती. मुलांना आई- बाबांच्या मोबाइलमध्ये फक्त कॉलिंग, मेसेजिंग आणि कॅमेरा या तीनच सुविधा हव्यात.
सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.
स्मार्टफोनमुळे निर्माण झाली भिंत
मुलांना आई-वडिलांचा वेळ हवा आहे; पण त्यांच्यात स्मार्टफोनमुळे एक भिंत निर्माण झाली आहे. मुले आणि आई-वडिलांमधील नात्यावर स्मार्टफोनचे परिणाम जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. स्मार्टफोनमुळे नात्यांना तडा जाण्याचा धोका आहे, असा इशाराही सर्वेक्षणातून देण्यात आला आहे.
७६% आणि ७२ टक्के मुलांनी मान्य केले की, ते स्मार्टफोनशिवाय राहू शकत नाहीत.
६४% मुलांनी मान्य केले की त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. पेक्षा जास्त ६०% मुलांचा सोशल मीडियावरील वावर हा मित्रांवर अवलंबून आहे.
७६% मुले आणि पालकांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे.
सोशल मीडियावर कोणाचा किती वेळ?
■ सर्वेक्षणानुसार, आई-वडील दररोज सरासरी ५ तास, तर मुले ४ तास स्मार्टफोनवर वेळ घालवतात.
■ सर्वाधिक वेळ हा सोशल मीडिया व मनोरंजनाच्या अॅपवर दिला जातो.
■ तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तंत्रज्ञानाचा वापर हा सकारात्मक बदल आणि आयुष्य सुलभ होण्यासाठी व्हायला हवा.
■ विशेष म्हणजे, आई-वडिलांच्या तुलनेत मुले स्मार्टफोनच्या दुष्परिणामांबाबत जागरूक आहेत, हे आढळले आहे.