स्वमग्न मुलांच्या पालकांची बदली नाही
By admin | Published: November 18, 2014 12:19 AM2014-11-18T00:19:21+5:302014-11-18T00:19:21+5:30
स्वमग्न अर्थात आॅटिज्म या आजाराने पछाडलेली मुले असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली न करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत़ केवळ एवढेच नाही
नवी दिल्ली : स्वमग्न अर्थात आॅटिज्म या आजाराने पछाडलेली मुले असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली न करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत़ केवळ एवढेच नाही तर बदली नाकारणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठीही बाध्य केले जाणार नाही़
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे़ अपंग मुले असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदलीत सवलत आहे़ आता यात ज्यांची मुले आॅटिज्मने पीडित आहेत, अशा कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे़
आॅटिज्मने प्रभावित मुलांची कायम काळजी घ्यावी लागते़ त्यामुळेच आॅटिज्मलाही ‘अपंग’ श्रेणीत सामील करण्यात आले आहे़ वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे अपंग मुलांचे पालक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर घालता कामा नये़ असे कर्मचारी बदली नाकारत असतील तर त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगणे हेही गैर आहे़ कारण अपंग मुलांचे पालनपोषण आणि पुनर्वसनासाठी पैशांची गरज असते़ अशा स्थितीत व्हीआरएसमुळे अपंग मुलाच्या पुनर्वसन प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम संभवतो, असे आदेशात म्हटले आहे़
अपंग श्रेणीत अंधत्व, अल्पदृष्टी, कर्णदोष, सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग, मतिमंदत्व, गतिमंदत्व, मानसिक आजार आदींचा समावेश आहे़ आॅटिज्म एक मनोवस्था आहे़ यात पीडितास संवाद साधण्यास प्रचंड अडचण येते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)