बलात्कारित मुलीची जबानी बदलण्यासाठी पालकांनी घेतली ५ लाख रुपयांची लाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:22 PM2018-04-17T23:22:38+5:302018-04-17T23:22:38+5:30
पंधरा वर्षे वयाच्या बलात्कारित मुलीने न्यायालयात दिलेली जबानी बदलावी यासाठी दबाव आणण्याकरिता काही जणांनी तिच्या पालकांना सुमारे पाच लाख रुपयांची लाच दिली. पण ही मुलगी इतकी बहाद्दर की, तिने पालकांना दाद लागू न देता ही लाचेची सारी रक्कम पोलिसांच्या हवाली केली.
नवी दिल्ली : पंधरा वर्षे वयाच्या बलात्कारित मुलीने न्यायालयात दिलेली जबानी बदलावी यासाठी दबाव आणण्याकरिता काही जणांनी तिच्या पालकांना सुमारे पाच लाख रुपयांची लाच दिली. पण ही मुलगी इतकी बहाद्दर की, तिने पालकांना दाद लागू न देता ही लाचेची सारी रक्कम पोलिसांच्या हवाली केली. या प्रकरणी तिच्या आईला अटक करण्यात आली असून, फरारी वडिलांचा शोध सुरू आहे.
ती मुलगी हे पैसे घेऊ न पोलीस ठाण्यात आली आणि तिने आपल्याकडे तीन लाख रुपयांची रक्कम आहे असे पोलिसांना सांगितले. प्रत्यक्षात ही रक्कम चार लाख शहाण्णव हजार रुपयांची होती. या प्रकरणात मुलीच्या पालकांना ज्यांनी पैसे दिले, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दिल्लीच्या अमन विहारमधील प्रेमनगर येथे ही मुलगी
आपल्या आईवडिलांसमवेत
राहाते. तिच्या पालकांचा छोटासा व्यवसाय आहे.
गेल्या वर्षी ३० आॅगस्ट रोजी ही मुलगी बेपत्ता झाली होती. आठवड्याने परतली त्यावेळी तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले होते की, स्थानिक प्रॉपर्टी डीलरसह दोघांनी तिचे अपहरण केले. नॉयडात काही ठिकाणी नेऊन त्यांनी वारंवार सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. त्यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे.
पैसे लपविले गादीखाली
या बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या ओळखीचे काही लोक त्या मुलीच्या आईवडिलांना भेटले. मुलीने न्यायालयात दिलेली जबानी बदलल्यास पालकांना
२० लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. त्यापैकी पाच लाख रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आली. हे मुलीला समजले. जबानी बदलण्यासाठी आईवडील बलात्कारित मुलीवर दबाव आणू लागले. मात्र त्याला ठाम नकार दिल्याने मुलगी व पालकांत सतत भांडणे होऊ लागली. पालकांना मिळालेले पैसे त्यांनी घरातल्या गादीखाली लपवून ठेवले होते. ती रक्कम घेऊन ही मुलगी १० एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात आली. तिने सगळा प्रकार कथन केल्यानंतर मग कारवाईची चक्रे फिरली.