'हंसी तो फंसी!', 'रेणुका चौधरींच्या कुत्सित हसण्यावरुन परेश रावल यांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 03:50 PM2018-02-08T15:50:45+5:302018-02-08T15:53:36+5:30
भाजपा खासदार आणि अभिनेता परेश रावल यांनीही वाहत्या पाण्यात हात धूत रेणुका चौधरींना टोला मारला आहे
नवी दिल्ली - राज्यसभेतील काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या कुत्सित हसण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोमणा मारल्यानंतर सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत आहे. भाजपा खासदार आणि अभिनेता परेश रावल यांनीही वाहत्या पाण्यात हात धूत रेणुका चौधरींना टोला मारला आहे. 'हंसी तो फंसी!', असं ट्विट परेश रावल यांनी केलं आहे. परेश रावल यांनी आपल्या ट्विटमध्ये भलेही रेणुका चौधरी यांचं नाव घेतलेलं नसलं, तरी सध्या राज्यसभेत रेणुका चौधरी यांच्या हसण्यावरुन सुरु असलेल्या वादावर हे ट्विट असल्याचं स्पष्ट आहे. परेश रावल यांनी याआधीही अनेक नेत्यांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं. परेश रावल यांनी ट्विट केल्यानंतर अनेक युजर्सनीही कमेंट करण्यास सुरुवात केली. सुमन शेखर सिंह यांनी लिहिलं आहे की, सर जी, जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तैसी…।
हँसी और फँसी !
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 7, 2018
काय आहे प्रकरण -
पंतप्रधान मोदी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेत बोलत होते. यावेळी मोदींच्या एका विधानावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसायला लागल्या. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत रेणुका चौधरी यांना कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, मोदींनी यावेळी कमलीचा हजरजबाबीपणा दाखवत रेणुका चौधरी यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना रेणुका चौधरी यांना काही म्हणू नका, असे म्हटले. कारण रामायण मालिका संपल्यानंतर आज पहिल्यांदाच असं हसू ऐकायला मिळालं, असे सांगत मोदींनी चौधरींच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली. यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला. रेणुका चौधरी यांनी काही म्हणण्याचा प्रयत्न केला पण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाल्यानंतर त्यांना शांत बसावे लागले.
दुसरीकडे मोदींनी रेणुका चौधरी यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी असे वक्तव्य करून स्त्रियांचा अपमान केला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर रेणुका चौधरी यांनी मोदी यांनी त्यांचे संस्कार दाखवून दिल्याचे म्हटले. मी पंतप्रधानांइतक्या खालच्या पातळीला जाऊ इच्छित नाही. मात्र, यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांची मानसिकता दिसून आल्याचे रेणुका चौधरी यांनी सांगितले.