"रात्री रील्स पाहणं बंद करा..."; 'परीक्षा पे चर्चा'मध्ये पंतप्रधान मोदींचे विद्यार्थ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 05:21 PM2024-01-29T17:21:12+5:302024-01-29T17:22:09+5:30
PM मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे यावर्षी होते सातवे सत्र
Pariksha Pe Charcha PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे सातवे सत्र यावर्षी आयोजित करण्यात आले होते. दिल्लीच्या भारत मंडपम हॉलमध्ये परीक्षा पे चर्चा 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अटल इनोव्हेशन प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांचे नवीन शोध देखील पाहिले. तसेच परीक्षा पे चर्चा कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना अनेक प्रश्न विचारले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रश्नांच्या उत्तरादरम्यान मोदींनी इन्स्टाग्राम रीलबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले.
एका विद्यार्थ्याने पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, परीक्षेची तयारी कशी करावी? विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर पीएम मोदी म्हणाले की, एक पुस्तक घ्या आणि काही वेळ उन्हात बसा. तुम्हाला पुरेशी झोप मिळेल हे देखील पाहा. त्यातही आई आणि वडिलांनी तुम्हाला झोपायला सांगितले तर त्यांनी सांगितलेले ऐका. त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करा आणि रात्रीच्या वेळेस फोन वापरू नका. सोशल मीडियावर रील स्क्रोल करणे बंद करा.
एका विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना असाही प्रश्न विचारला की, इतके काम आणि दबाव असताना तुम्ही सकारात्मक कसे राहू शकता? त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, या दबावाकडे मी चांगल्या दृष्टीने पाहतो. पंतप्रधान या पदाला खूप दबावाचा सामना करावा लागतो. पण मी आव्हानांनाही आव्हान देतो. काहीही झाले तरी १४० कोटी देशवासी माझ्यासोबत आहेत, असा माझा नेहमीच विश्वास आहे. लाखो आव्हाने असतात आणि त्यासाठी करोडो लोक माझ्यासोबत आहेत. हाच विचार मला सकारात्मक ऊर्जा देतो.