जेवढ्या किमतीत घेतली पार्किंग स्पेस, तेवढ्यात आला असता मोठा बंगला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 05:39 AM2019-11-03T05:39:46+5:302019-11-03T05:40:09+5:30
ज्या व्यक्तीकडे बिल्डिंगमध्ये पार्किंग स्पॉट असेल त्या व्यक्तीला एक वेगळीच प्रतिष्ठा असते.
अलीकडे कारपार्किंगची कशी पंचाईत झाली आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. ज्या व्यक्तीकडे बिल्डिंगमध्ये पार्किंग स्पॉट असेल त्या व्यक्तीला एक वेगळीच प्रतिष्ठा असते. या पार्किंग स्पॉटच्या किमतीही अव्वाच्या सव्वा असतात. पण पार्किंग स्पॉटची एक किंमत समोर आली असून ही किंमत वाचून तुम्ही चक्रावून जाल. हाँगकॉँगमध्ये एक पार्किंग स्पॉट तब्बल ६.९ कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा पार्किंग स्पॉट जगातला सर्वांत महागडा पार्किंग स्पॉट ठरला आहे. रिपोर्टनुसार, हा पार्किंग स्पॉट लॉजिस्टिक बिझनेसमन जॉनी चेऊंग यांच्या मालकीचा होता. त्यांचं आॅफिसही बाजूच्याच बिल्डिंगमध्ये होतं.
किती जागा आहे
मीडिया रिपोर्टनुसार, या पार्किंग स्पॉटचा आकार १३५ स्क्वेअर फूट इतका आहे. ज्या व्यक्तीने हा पार्किंग स्पॉट खरेदी केलाय त्या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. हाँगकॉँगमध्ये जमीन फारच कमी आहे. त्यामुळे इथे प्रॉपर्टी रेट चार पटीने वाढला आहे. हॉँगकाँगमध्ये गेल्या वर्षी एक पार्किंग स्पॉट ५ कोटी रुपयांना विकला गेला होता. १५० वर्ग फुटांचा पार्किंग स्पॉट ५,०८,७८,२०० रुपयांना विकला गेला होता. त्यासोबतच २०१७ मध्ये इथेच १८८ स्क्वेअर फुटांचं पार्किंग साधारण ४ कोटी रुपयांना विकलं गेलं होतं.