संसदेचे कामकाज दोन दिवस स्थगित
By admin | Published: July 29, 2015 02:40 AM2015-07-29T02:40:17+5:302015-07-29T02:40:17+5:30
देशाचे सच्चे सुपुत्र व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.
नवी दिल्ली : देशाचे सच्चे सुपुत्र व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व सदस्यांनी कलामांना श्रद्धांजली अर्पण केली. आज मी अत्यंत जड मनाने भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करते. ते देशाचे सच्चे सुपुत्र होते, असे महाजन म्हणाल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि बहुतांश सदस्य माजी राष्ट्रपतींना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी व सदस्यांनी कलामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. शिवाय संसद सदस्यांना कलामांच्या अंत्यसंस्कारात सामील होता यावे यासाठी बुधवारसाठीही (२९ जुलै) संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
कॅबिनेट, निवडणूक आयोगाचीही श्रद्धांजली...
केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंगळवारी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली.
कलाम यांच्या निधनाने देशाने एक प्रभावी वैज्ञानिक, सच्चा देशभक्त आणि एक महान कर्मयोगी गमावला, अशा आशयाचा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला.
निवडणूक आयोगानेही एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. आयोगाने २०१० मध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम राबविला होता. कलाम यांनी यात सहभाग नोंदवला होता.
स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेतील व्यापक सहभागिता आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर याचा त्यांनी कायम पुरस्कार केला, असे आयोगाने मंगळवारी जारी निवेदनात म्हटले आहे.