संसदेच्या बजेट सत्रात कामकाजाचा बोऱ्या, अविश्वास ठराव आलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:49 AM2018-04-06T05:49:37+5:302018-04-06T05:49:37+5:30
संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली - संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही. अपवाद एससी/एसटी अॅक्टचा. भारत बंदच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने गृहमंत्री राजनाथसिंग यांनी ६ मिनिटांचे निवेदन केले. त्यावरील चर्चा दीड मिनिटांत आटोपली.
लोकसभेत ४ एप्रिलपर्यंत सत्ताधारी व विरोधक यांची २0१९ वेळा आरडाओरड झाली, तर ५८ प्रसंगी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत सदस्यांनी घोषणाबाजी केली. कावेरी बोर्ड स्थापनेसाठी अद्रमुक सदस्यांचा गोंधळ सर्वाधिक होता. सत्ताधारी पक्षालाच कामकाज नको असल्याने अद्रमुक सदस्यांना गोंधळ घालायला लावल्याचा आरोपही विरोधकांनी केला. लोकसभा अध्यक्षांनी ६0 वेळेस सदस्यांना ‘आपापल्या जागेवर जा, गदारोळामुळे मला कोणाचेही म्हणणे ऐकू येत नाही, आता पुरे झाले’, असे आवाहन करूनही उपयोग झाला नाही. अध्यक्षांनी ४४ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्या ४२ वेळा ‘आय एम सॉरी’ म्हणाल्या. लोकसभा अन् राज्यसभेचे कामकाज किमान १५ वेळा दोन ते तीन मिनिटांत संपले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून तेलगू देशमने गोंधळ घातला, तर अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी काँग्रेस, तृणमूलसह अन्य विरोधकही आक्रमक होते.
सेनेचा विरोध
दुसºया सत्राच्या २३ दिवसांत कोणतेही महत्त्वाचे कामकाज न झाल्याने एनडीएचे सदस्य २३ दिवसांचा पगार व भत्ते घेणार नसल्याची घोषणा संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी केली. मात्र हे आम्हास मान्य नाही, आमचा पगार दान करायचा अथवा तो कुठे कोणासाठी खर्च करायचा, याचा निर्णय शिवसेना घेईल, आमच्या वतीने हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिलेला नाही, असे खा. संजय राऊ त म्हणाले.
वित्त विधेयके व ४ अन्य विधेयके चर्चेशिवाय मंजूर झाली. सरकारवरील अविश्वासाचा प्रस्ताव दाखलच करून घेतला नाही. राज्यसभेत सुषमा स्वराज यांचे इराकमध्ये ३९ भारतीयांच्या हत्येबाबतचे निवेदन, निवृत्त सदस्यांना निरोप व नव्या सदस्यांचा शपथविधी हेच नीट झाले.
लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. प्रश्नांना लेखी उत्तरे मिळाली. पहिल्या सत्रात कामकाज २५ तास ५४ मिनिटांचे होते व झाले २८ तास २४ मिनिटे. दुसºया सत्रात १0३ तास २७ मिनिटे वेळ वाया गेली.