"काही लोकांचे लक्ष फक्त जॅकूझी आणि शॉवरवर"; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:17 IST2025-02-04T17:38:19+5:302025-02-04T18:17:31+5:30

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला

Parliament Budget Session PM Modi targeted Arvind Kejriwal without naming him | "काही लोकांचे लक्ष फक्त जॅकूझी आणि शॉवरवर"; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा

"काही लोकांचे लक्ष फक्त जॅकूझी आणि शॉवरवर"; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा

Parliament Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आज प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी कथित शीशमहलवरून त्यांच्यावर टीका केली. काही जणांनी स्टायलिश शॉवरवर लक्ष केंद्रित केले पण आम्ही प्रत्येक घरात पाणी देण्यावर लक्ष दिलं असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. काही नेते फक्त जॅकूझी आणि स्टायलिश शॉवर वर लक्ष केंद्रित करतात तर भाजपने प्रत्येक घरात पाणी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. आमच्या सरकारने लाखो कोटी रुपये वाचवले आणि ते देशाच्या उभारणीसाठी वापरले, शीशमहल बांधण्यासाठी नाही.

"आजकाल मीडियामध्ये खूप चर्चा आहे. काही नेते घरांमध्ये जॅकूझीवर, स्टायलिश शॉवरवर लक्ष केंद्रित करत आहेत. पण आमचे लक्ष्य प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यावर आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर, देशातील ७५ टक्के, १६ कोटींहून अधिक लोकांकडे नळाची जोडणी नव्हती. आमच्या सरकारने १२ कोटी कुटुंबांना त्यांच्या घरात नळाचे पाणी देण्याचे काम केले. आम्ही गरिबांसाठी इतकं काम केलं की, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात त्याचं सविस्तर वर्णन केलं आहे. काही लोक गरिबांच्या झोपडीत फोटो सेशन्स करून मनोरंजन करतात, त्यांना संसदेत गरिबांवर बोलण्याचा कंटाळा येईल, त्यांचा राग मी समजू शकतो," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना ज्या बंगल्यात राहत होते, त्या बंगल्याला भाजपने शीशमहल म्हटलं होतं. तसेच केजरीवाल्यांच्या बंगल्यात पंचतारांकित हॉटेल्ससारखे जॅकूझी आणि महागडे शॉवर्स बसवण्यात आले होते, असाही आरोप भाजपने केला होता. दुसरीकडे, मतदानाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी शीशमहलचा उल्लेख करताना आप प्रमुखांवर जोरदार निशाणा साधला. दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक सभांमध्ये शीशमहलचा उल्लेख करून केजरीवालांवर टीका केली होती.

Web Title: Parliament Budget Session PM Modi targeted Arvind Kejriwal without naming him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.