संसदेचे अधिवेशन संपले; आता संघर्ष रस्त्यावर! मोदींच्या गॅरंटीची गाडी भाजप प्रत्येक घरी पोहोचवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 06:07 AM2023-12-22T06:07:50+5:302023-12-22T06:08:07+5:30
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या संसद अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. आता संघर्ष संसदेऐवजी रस्त्यांवर लढला जाणार आहे.
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीची गाडी प्रत्येक घरी पोहोचवण्याबरोबरच काँग्रेस व विरोधकांच्या कारभाराचा पर्दाफाशही प्रत्येक घरी पोहोचवण्याचे काम आता भाजप करणार आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या संसद अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. आता संघर्ष संसदेऐवजी रस्त्यांवर लढला जाणार आहे. हे संसदेचे अधिवेशन ऐतिहासिक ठरले. कारण, आजवर कोणत्याही संसद अधिवेशनात एवढ्या मोठ्या संख्येने खासदार कधीही निलंबित करण्यात आले नव्हते. संसदेऐवजी आता देशातील रस्ते रणक्षेत्र होणार आहेत. दोन महिन्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट् ट्रिक करण्यासाठी मैदानात उतरत आहेत तर काँग्रेस व विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या माध्यमातून टक्कर देण्याची तयारी करीत आहेत.
१ जानेवारीपासून भाजप व केंद्र सरकार संपूर्ण देशात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची मोहीम उघडत आहे. यातून जनतेपर्यंत जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
‘भाजप’ची निवडणुकीची तयारी सुरू
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यांत मिळालेल्या विजयाने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. भाजप आता अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची मोहीम उघडत आहे.
२०२४च्या निवडणुकीचाही हाच अजेंडा असणार आहे. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ प्रत्येक घरी नेण्यासाठीची मोहीम आधीच सुरू केलेली आहे. ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
राहुल गांधी यांच्यावर सर्वांच्या नजरा
सर्व नजरा राहुल गांधी यांच्यावर आहेत. राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहे. भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांचा एकच उमेदवार उतरवून विरोधकांची मते विभागली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यांवर उतरण्याची रणनीती भाजपकडूनही सुरू आहे.
‘इंडिया’ आघाडीत अडथळा काय?
इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी प्रस्ताव आल्याने काँग्रेसबरोबरच सर्व विरोधी पक्षांचे नेते आश्चर्यचकीत झाले होते. विरोधकांचा नेता कोण होणार, ही इंडिया आघाडीची सर्वांत कमजोरी राहिली आहे तर जागावाटपाची दुसरी मोठी
समस्या आहे.