गंभीर विषयांनी दणाणली संसद

By admin | Published: December 15, 2015 01:39 AM2015-12-15T01:39:57+5:302015-12-15T01:39:57+5:30

रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण काढतांना दिल्लीच्या शकुरबस्ती भागात ६ महिन्यांच्या तान्ह्या मुलीचा दुर्देवी मृत्यू , पंजाबमधे अबोहर येथे अकाली दल नेत्याच्या फार्म हाऊ सवर

Parliament by the grave issue | गंभीर विषयांनी दणाणली संसद

गंभीर विषयांनी दणाणली संसद

Next

नवी दिल्ली : रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण काढतांना दिल्लीच्या शकुरबस्ती भागात ६ महिन्यांच्या तान्ह्या मुलीचा दुर्देवी मृत्यू , पंजाबमधे अबोहर येथे अकाली दल नेत्याच्या फार्म हाऊ सवर २ दलितांचे हात पाय कापल्याची निर्घृण घटना व केरळात पंतप्रधानांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री ओमेन चांडी यांना टाळण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या सूचना या तीन कारणांवरून राज्यसभा आणि लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी सोमवारी प्रचंड गदारोळ केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अर्थमंत्री अरूण जेटली गृहमंत्री राजनाथसिंग व राज्यमंत्री नकवींनी तिन्ही घटनांचा थोडक्यात खुलासा सरकारतर्फे केला तथापि त्यांच्या खुलाशाने समाधान न झाल्याने काँग्रेसने लोकसभेत सभात्याग केला तर विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले.
शकुरबस्तीत रेल्वेच्या जमिनीवरचे अतिक्रमण काढण्यापूर्वीच लहान मुलीचे निधन झाले होते, असा खुलासा करीत रेल्वेमंत्री प्रभू लोकसभेत म्हणाले, तीनदा नोटीसा बजावल्यानंतरही रेल्वेच्या संपत्तीवरील अतिक्रमण झोपडपट्टीवासियांनी हटवले नाही. अखेर रेल्वेला कारवाई करावी लागली. अतिक्रमण हटवण्याची मोहिम दुपारी १२ वाजता सुरू झाली. त्यापूर्वी सकाळी १0.३0 च्या सुमारासच मुलीचे निधन झाल्याचे वृत्त सर्वांना समजले होते. गाठोड्याखाली दबल्याने लहान मुलगी दगावली, असे मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगीतले. याच स्वरूपाचा खुलासा रेल्वे अधिकाऱ्यांनी रविवारी केला होता. प्रभूंनी त्याचा पुनरूच्चार केला.
पंजाबमधे फाजिलका जिल्ह्यातील अबोहर येथे अकाली दलाच्या शिवलाल डोडा नामक नेत्याच्या फार्म हाऊ सवर दोन दलितांचे हात पाय कापल्याची निर्घृण घटना घडली. यापैकी भीम टाक हा मरण पावला असून एक हात गमावलेला गुरजंतसिंग रूग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत आहे. या संदर्भात ११ लोकांविरूध्द गुन्हा दाखल झाला तरी परिसरात प्रचंड तणाव आहे. पंजाबमधले अकाली दल भाजप आघाडीचे सरकार त्वरित बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस व बसपने राज्यसभेत केली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व मायावतींनी हा विषय राज्यसभेत उपस्थित करताच संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार नकवी म्हणाले, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत हा विषय आहे. पंजाब सरकारने संबंधितांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी राज्यसभेचे कामकाज रोखणे योग्य नाही. उपसभापती कुरियन यांनीही काँग्रेस खासदारांना समजावण्याचा प्रयत्न केला तथापि गदारोळ थांबला नाही, अखेर चारदा तहकूब झालेल्या राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.
केरळात एसएनडीपी संस्थेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान सोमवारी केरळला गेले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री ओमेन चांडी भूषवणार होते. तथापि पंतप्रधान कार्यालयातून एका ओएसडीचा फोन गेल्यावर मुख्यमंत्र्यांना दिलेले निमंत्रण सदर संस्थेने मागे घेतले असा आरोप काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांनी केला. ते म्हणाले, पंतप्रधानांचा दौरा ज्या प्रकारे होतो आहे, तो केवळ मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर समस्त केरळच्या जनतेचा अपमान आहे.
सदर आरोपाचे खंडन करतांना राज्यसभेत अरूण जेटली व लोकसभेत राजनाथसिंग म्हणाले, एसएनडीपी
ही केरळातील एक खाजगी संस्था आहे. कार्यक्रमाला कोणाला
निमंत्रित करावे आणि कोणाला टाळावे, हा सर्वस्वी त्या संस्थेचा अधिकार आहे. संस्थेने मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले होते मात्र दरम्यानच्या काळात संस्थेच्या सचिवाविरूध्द राज्य सरकारने काही कारवाई केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना दिलेले निमंत्रण सदर संस्थेने मागे घेतले, अशी माहिती हाती आली आहे. केंद्र सरकार अथवा पंतप्रधान कार्यालयाने त्यात कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. (विशेष प्रतिनिधी)

तीनही विषयांवर उभय सभागृहात काँग्रेसचे सदस्य सर्वाधिक आक्रमक होते. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास गोंधळातच पार पडला. शून्यप्रहरात याच विषयांवर काँग्रेसने सभात्याग केला. राज्यसभेत प्रचंड गदारोळात सुषमा स्वराज यांनी इस्लामाबाद दौऱ्याचे निवेदन वाचून दाखवले. सभागृहात गदारोळ सुरूच होता. अखेर गोंधळ घालणाऱ्या सदस्यांपुढे उपसभापतींना झुकावेच लागले. त्यात चार वेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब झाले.

Web Title: Parliament by the grave issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.