संसद घुसखोरीतील आरोपीचा जामीनासाठी अर्ज; न्यायालयाने पोलिसांकडे म्हणणं मागितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:29 PM2024-01-02T23:29:01+5:302024-01-02T23:29:39+5:30
संसद भवन घुखोरी प्रकरणातील सर्वच ६ आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर युएपीए अॅक्टनुसार म्हणजेच दहशतवादी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे
हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच राजधानी दिल्लीतीलसंसद भवनात काही युवकांनी घुसखोरी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. विशेष म्हणजे १३ डिसेंबर रोजी, सन २००१ साली याच दिवशी अफलज गुरुनेही संसदेत घुसखोरी करत दहशतवादी हल्ला केला होता. त्याच दिवशी देशातील काही तरुणांनी संसदेत घुसखोरी करत सरकारचे आणि देशाचे लक्ष वेधले होते. आपण कुठल्याही संघटनेचे कार्यकर्ते नसून विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक असल्याचं त्यांनी म्हटलं. याप्रकरणी त्यांच्या UAPA कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
संसद भवन घुखोरी प्रकरणातील सर्वच ६ आरोपींना दिल्लीपोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर युएपीए अॅक्टनुसार म्हणजेच दहशतवादी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये, नीलम नावाच्या एका तरुणीचाही सहभाग आहे. नीलमच्या जामीनासाठी तिच्या विकलांनी अर्ज केला असून न्यायलयाने दिल्ली पोलिसांनी बाजू मांडण्यास सांगितले आहे. न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलिसांनी बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
दुसरीकडे अतिरीक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी याप्रकरणातील ६ आरोपींच्या पॉलीग्राफ चाचणीच्या मागणीसंदर्भातील याचिकेवर ५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनीच पॉलीग्राफ चाचणीची मागणी न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणातील आरोपी नीलम आझाद, मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, ललित झा आणि महेश कुमावत सध्या ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
नव्या संसदेत घुसखोरी
हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच १३ डिसेंबर रोजी संसद सभागृहात तरुणांनी बाकावर उड्या मारल्या. त्यानंतर पिवळ्या धुराचे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. संपूर्ण देश या घटनेनी ढवळून निघाला. आरोपींनी तानाशाही नही चलेगी, वंदे भारत, भारत माता की जय.. अशा घोषणाही दिल्या होत्या. या घटनेसंदर्भात समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या. संसदेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. संसदेसारख्या अतिमहत्त्वाच्या वास्तूची यंत्रणा कमकुवत कशी असू शकते यावर सखोल ऊहापोह करण्यात आला. तर, काहींनी त्यांच्या कृतीमागील जो उद्देश आहे, त्याकडे लक्ष वेधत सरकारवर टीका केली.