संसदेतील घुसखोरी गंभीर : पंतप्रधान; म्हणाले, चौकशी सुरू, जास्त चर्चा नको
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:13 AM2023-12-18T06:13:41+5:302023-12-18T06:13:56+5:30
घुसखोरीच्या घटनेचे गांभीर्य कमी केले जाऊ नये. लोकसभा अध्यक्ष सर्व आवश्यक पावले उचलत आहेत - मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मागील आठवड्यात संसदेत झालेली घुसखोरीची घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामागे कोणते घटक आहे, घुसखोरांचे उद्दिष्ट काय आहे, हे शोधणे महत्त्वाचे आहे. सखोल तपास सुरू असून त्यावर चर्चा, वादविवाद करण्याची गरज नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
घुसखोरीच्या घटनेचे गांभीर्य कमी केले जाऊ नये. लोकसभा अध्यक्ष सर्व आवश्यक पावले उचलत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. लोकसभेत मागील बुधवारी प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारत घोषणबाजी केली, तसेच स्मोक क्रॅकर फोडत रंगीत धूरही केला. त्यांच्या घुसखोरीचा उद्देश मणिपूर हिंसाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा होता, असे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी जप्त केले फोनचे तुकडे
संसदेतील घुसखोरीप्रकरणी चार दिवसांनी दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या नागौरमधून काही तुटलेल्या आणि जळालेल्या मोबाइल फोन्सचे तुकडे जप्त केले आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
पोलिसांनी आरोपींविरुद्धच्या एफआयआरमध्ये पुरावे नष्ट करण्याशी संबंधित भारतीय दंड संहितेची कलमे जोडली आहेत. अटक केलेल्या सहा जणांपैकी एक ललित झा याच्या सांगण्यावरून शनिवारी मोबाइल फोनचे काही तुकडे जप्त करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने शनिवारी झा याला राजस्थानमधील नागौर येथे नेले. तिथे तो आरोपी महेश कुमावतच्या मदतीने राहिला होता. या प्रकरणाशी संबंधित तांत्रिक पुरावे लपवण्यासाठी झा आणि कुमावत याने जाणूनबुजून मोबाइल फोन नष्ट केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.