संसद ठप्प; दुसरा दिवसही पाण्यात
By admin | Published: July 23, 2015 12:04 AM2015-07-23T00:04:04+5:302015-07-23T00:04:04+5:30
ललित मोदीप्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्रीद्वय वसुंधरा राजे आणि शिवराजसिंग चौहान यांच्या
नवी दिल्ली: ललित मोदीप्रकरण आणि व्यापमं घोटाळ्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, मुख्यमंत्रीद्वय वसुंधरा राजे आणि शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्यानी मागणी करणारी काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बुधवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात वाहून गेला.
गदारोळात दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार ठप्प पडल्याने अखेर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सत्ताधाऱ्यांची चर्चेची तयारी असताना विरोधक मात्र परराष्ट्र मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच चर्चा या मागणीवर ठाम होते.
लोकसभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व सदस्य काळ्या पट्ट्या बांधून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी आसनासमक्ष येऊन ‘नही चलेगी नही चलेगी भ्रष्ट सरकार नही चलेगी’,अशी नारेबाजी केली. डाव्या पक्षांचे सदस्यही त्यात सहभागी झाले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही गोंधळ सुरूच होता. तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या सदस्यांनीही स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी उचलून धरली.
लोकसभा अध्यक्षांची ताकीद
सकाळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. नंतर निघून गेले.
अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विरोधी पक्ष सदस्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. दरम्यान सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी व्यापमं हा राज्याचा विषय असल्याकडे लक्ष वेधून सभागृहात एखाद्या राज्याचा विषय उपस्थित करण्याची परवानगी दिल्यास आम्हीसुद्धा केरळ, हिमाचल प्रदेश, आसाम आणि गोव्यातील वादग्रस्त मुद्दे चर्चेसाठी उपस्थित करू असा इशारा दिला.
स्थगन प्रस्ताव नोटीस फेटाळली
लोकसभा, राज्यसभेत अनेक विरोधी सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. परंतु ती फेटाळ्यात आली. (वृत्तसंस्था)