संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचा होता प्लॅन A आणि B; मास्टरमाइंड ललितचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:24 PM2023-12-15T16:24:44+5:302023-12-15T16:25:10+5:30
महेश आणि कैलाश गुरुग्राममध्ये विशाल शर्मा उर्फ विक्कीच्या घरी पोहोचू शकले नाहीत, जिथे संपूर्ण ग्रुप राहत होता.
संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. या संदर्भात, मुख्य आरोपी ललित झा याने गुरूवारी रात्री पोलीस ठाण्यात सरेंडर केलं आहे. ललितने पोलिसांना सांगितले की, घुसखोरीचा त्यांचा मुख्य प्लॅन फसला, तर त्याच्याकडे प्लॅन बीही होता. झा यांनी सांगितलं की, काही कारणास्तव प्लॅन ए नुसार, नीलम आणि अमोल यांना संसद भवनाजवळ जायचं होतं, जर ते त्यात अयशस्वी झाले तर महेश आणि कैलाश दुसर्या बाजूने संसदेकडे जातील आणि नंतर संसदेसमोर स्मोक क्रॅकर्सचा वापर करत घोषणाबाजी करतील.
महेश आणि कैलाश गुरुग्राममध्ये विशाल शर्मा उर्फ विक्कीच्या घरी पोहोचू शकले नाहीत, जिथे संपूर्ण ग्रुप राहत होता. त्यामुळे अमोल आणि नीलम यांना संसदेबाहेरील कामकाज कोणत्याही किंमतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 2001 च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली, पिवळा स्प्रे फवारला आणि घोषणाबाजी केली, परंतु नंतर त्यांना पकडण्यात आलं.
खासदार आणि सुरक्षा दलांनी त्यांना पकडलं त्याच वेळी अमोल आणि नीलम यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत निषेध केला. आरोपींच्या संपूर्ण गटाने प्लॅन A यशस्वी केला. या घटनेनंतर ललितने लपण्याचा कटही रचला होता. या योजनेनुसार ललितला राजस्थानमध्ये अज्ञातवासात जाण्यास मदत करण्याची जबाबदारी महेशवर देण्यात आली होती.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महेशने त्याचे ओळखपत्र वापरून ललितच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि ललित, महेश आणि कैलाश सतत माहिती गोळा करत होते.मात्र, ललित आणि महेश यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाणे गाठून सरेंडर केलं. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आझाद, विकी आणि विकीची पत्नी, महेश, कैलाश, ललित झा आणि अमोल शर्मा यांचा समावेश आहे.