'महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली'; अमित शहांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 07:22 PM2023-08-09T19:22:18+5:302023-08-09T19:22:42+5:30
'वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले.'
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर 8-10 ऑगस्टदरम्यान चर्चा होणार आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. यावेळी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपाने 9 वर्षांत 9 सरकारे पाडल्याचा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपाच्या काळात महागाई वाढली. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी झाले. मोदी सरकारच्या काळात दुध महागले. जगातील अनेक यादीत भारताची घसरण झाली. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचे सर्वांत मोठे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. वंदे भारत ट्रेन गरिबांसाठी नाही. मी वंदे भारतच्या विरोधात नाही, मात्र हे सत्य नाकारता येणार नाही. सरकारने त्यांच्या 9 वर्षांच्या काळात 9 सरकारे पाडली, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
अमित शहांचे प्रत्युत्तर
दरम्यान, आज(दि.9) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अविश्वास प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर एकापाठोपाठ एक घणाघाती टीका केल्या. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मणिपूर हिंसाचारापासून काँग्रेसच्या भ्रष्टाचारापर्यंत अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांना घेतले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आरोपांचेही उत्तर दिले. शहा म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही 9 वर्षात 9 सरकारे पाडली. पण, महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे काम सर्वात पहिले शरद पवारांनी केले. त्यांनीच वसंतदादा पाटलांचे सरकार पाढून जनसंघसोबत सरकार स्थापन केले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.
काँग्रेसवर घणाघाती टीका
यावेळी शहांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत खंत व्यक्त करताना दिलेल्या रुपयाचे उदाहरण देत काँग्रेसची कोंडी केली. शह म्हणाले की, एकदा या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं होतं की, मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यातील केवळ 15 पैसेच पोहोचतात. तेव्हा ते नवीनच राजकारणात आले होते, प्रामाणिक व्यक्ती होते, बोलून गेले. पण मी आता पुढे विचारतो की, ते 85 पैसे पळवायचा कोण, असा टोला अमित शह यांनी लगावला.