अतिक अहमदला लोकसभेत वाहिली श्रद्धांजली; अध्यक्ष ओम बिर्ला नेमके काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:21 PM2023-07-21T23:21:35+5:302023-07-21T23:26:01+5:30
Parliament Monsoon Session 2023: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, अतिक अहमदला लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Parliament Monsoon Session 2023: काही महिन्यांपूर्वी प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोन्ही भावांना गोळ्या घालण्यात आल्या. यातच आता अतिक अहमदला लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आल्याची बाब समोर आली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी निधन पावलेल्या लोकसभा सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. संसदीय सभागृहाच्या परंपरेनुसार, पहिल्या दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी खासदारांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या यादीत दोन खासदार असताना निधन पावलेले आणि ११ माजी खासदारांची नावे आहेत. ओम बिर्ला यांनी उत्तर प्रदेशातील गुंड-राजकारणी अतिक अहमदला श्रद्धांजली वाहिली. अतिक अहमदची १५ एप्रिल रोजी प्रयागराज जिल्हा रुग्णालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
अतिक अहमदला लोकसभेत वाहिली श्रद्धांजली
अतिक अहमद उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून १४ व्या लोकसभेचे सदस्य होते. तसेच, अतिक अहमद रेल्वेवरील समितीचे सदस्य होते. त्याआधी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य होते. अतिक अहमद यांचे १५ एप्रिल २०२३ रोजी प्रयागराज येथे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ओम बिर्ला यांनी दिवंगत खासदार रतनलाल कटारिया आणि बाळूभाऊ उर्फ सुरेश नारायण धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, रणजित सिंग, सुजान सिंग बुंदेला, संदीपान थोरात, विश्वनाथ कानिठी, त्रिलोचन कानूनगो, इलियास आझमी, अनादी चरण दास, निहाल सिंग आणि राज करण सिंग यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.