पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गदारोळाने! अग्निपथ, महागाईवरून विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:07 AM2022-07-19T06:07:11+5:302022-07-19T06:07:50+5:30
संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधक आक्रमक झाल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच सोमवारी घोषणाबाजीने झाली. अग्निपथ, महागाई, खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याच्या निर्णयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधक आक्रमक झाल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेत दुपारी २ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेस आणि अन्य पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करू लागले. काही सदस्यांनी हातात फलक घेतले होते. त्यावर पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा उल्लेख होता. लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना परवानगी देण्यात आली नाही. सभागृहातील घोषणाबाजी सुरू असतानाच सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी दुपारी २.५ वाजता सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी हे उपस्थित होते.
राज्यसभेतही घोषणाबाजी
राज्यसभेतही कार्यवाही सुरु होताच एक तासाच्या आत विरोधी पक्षाचे सदस्य विविध मुद्द्यांवर आक्रमक झाले. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी, सभापती व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी सर्व राजकीय पक्षाच्या सदस्यांना संसदेतील वेळेचा उपयोग करण्याचे आवाहन केले.