भारताच्या नव्या संसद भवनाच्या बांधकामात रशिया-युक्रेन युद्धामुळे अडथळा, इंटेरिअरचं काम रखडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:38 PM2022-11-01T17:38:32+5:302022-11-01T17:44:08+5:30
केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही या वर्षी संसदेचं हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होण्याची शक्यता धुसर आहे. सलग २४ तास बांधकाम सुरू असतानाही संसदेच्या बांधकामाला विलंब होत आहे.
केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही या वर्षी संसदेचं हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होण्याची शक्यता धुसर आहे. सलग २४ तास बांधकाम सुरू असतानाही संसदेच्या बांधकामाला विलंब होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या नवीन इमारतीच्या वायरिंग आणि ऑडियो व्हिज्युअल कामात विलंब होत आहे. नवीन संसद भवनासाठी काही ऑडियो व्हिज्युअल उपकरणं युक्रेनमधून येणार आहेत, जी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वेळेवर पोहोचलेली नाहीत.
संसद भवनाच्या नवीन इमारतीचे सिव्हिल वर्क आणि स्ट्रक्चरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे परंतु मजल्यावरील आणि आतील फिनिशिंगचे काम सुरू आहे. म्हणजेच नवीन इमारतीतील इंटेरिअरचं काम अद्याप अपूर्ण आहे. ज्या गतीनं बांधकाम सुरू आहे ते पाहता संसद भवनाचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे या प्रकल्पाशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे. नवीन संसद भवनाचं इंटेरिअरचं काम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. जे नंतर संसदेत आणून फीट केले जाईल. उदाहरणार्थ, फर्निचर, कार्पेट्स, वॉल वूड इत्यादी सर्व कामे स्वतंत्रपणे तयार करून संसद भवनात आणून बसवली जाणार आहेत.
नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन संसद भवन सुरू होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच संसदेच्या नव्या इमारतीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. संसदेचं कामकाज संपलं की, तेथील कर्मचाऱ्यांसोबत मॉक ड्रिल करावं लागते. या मॉक ड्रीलमध्ये संसदेतील सर्व कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा यांना वेळ द्यावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत किमान २ ते ३ आठवडे द्यावे लागतील. बांधकाम प्रक्रियेशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार कोविडमधील न्यायालयीन प्रक्रिया आणि पर्यावरणीय मंजुरीमुळे बांधकामाच्या कामात थोडा विलंब झाला आहे.
नवीन इमारतीत घेऊ शकलं जाईल एकदिवसीय विशेष अधिवेशन
संसदीय प्रक्रियेशी संबंधित एका व्यक्तीच्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनाची तयारी संसदेच्या जुन्या इमारतीतूनच केली जात आहे. मात्र, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नवीन इमारतीतून एक दिवस संसदेचे कामकाज चालवलं जाण्याची शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.