खळबळजनक! 6 आरोपींचा ग्रुप, रेकी, प्लॅनिंग आणि गदारोळ; संसदेतील घुसखोरीचा 'असा' होता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:56 AM2023-12-14T10:56:09+5:302023-12-14T11:02:57+5:30
सहाही आरोपी चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी प्लॅन केला होता.
संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेची सुरक्षा भंग करण्याचा कट 6 जणांनी रचला होता. कट रचणाऱ्या सहा जणांपैकी पाच जणांना पोलिसांनी पकडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाही आरोपी चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी प्लॅन केला होता. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते आणि बुधवारी संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.
बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या होत्या. त्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या बुटातून पिवळा स्प्रे काढला आणि फवारणी केली. यावेळी संसदेत गदारोळ झाला. खासदारांची इकडे-तिकडे पळापळ सुरू झाली. मात्र काही खासदारांनी त्यांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. दोन लोकांनी उडी मारली, तेव्हा संसदेबाहेर निदर्शने करत असताना पोलिसांनी एक पुरुष आणि एका महिलेला अटक केली. दोघेही रंगीत गॅस फवारत होते आणि घोषणा देत होते.
अमोल आणि नीलम अशी दोघांची नावे आहेत. हे चौघे एकमेकांना ओळखत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आले आणि प्लॅन केला. पोलिसांनी सागर, मनोरंजन, अमोल आणि नीलम यांना ताब्यात घेतलं आहे. तर एक आरोपी विशाल याला गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. संसदेत पोहोचण्यापूर्वी सर्व आरोपी विशालच्या घरी थांबले होते. दुसरा आरोपी ललित याचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने तपास सुरू केला आहे.
"शेतकरी आंदोलन, मणिपूर हिंसाचार आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांमुळे त्रस्त"
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान अमोलने सांगितले की, तो शेतकरी आंदोलन, मणिपूर हिंसाचार आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांमुळे त्रस्त होता आणि त्यामुळेच त्याने हे केले. या सर्वांची विचारधारा ही एकसारखीच आहे. त्यांना सरकारला संदेश द्यायचा होता म्हणून त्यांनी हे करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपींना कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने असे करण्यास सांगितले होते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि ललित मंगळवारी रात्री गुरुग्राममध्ये विशालच्या घरी थांबले. सकाळी ते संसदेकडे रवाना झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशाल शर्मा आधी एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते, पण अलीकडेच त्यांनी ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांनी दावा केला की विशाल हा मद्यपी असून तो अनेकदा पत्नीशी भांडतो.
ललितने संसदेबाहेर बनवला व्हिडीओ
पोलिसांनी विशालच्या पत्नीलाही ताब्यात घेतले असून या घटनेतील तिची संभाव्य भूमिका तपासण्यात येत आहे. सहाही आरोपींना संसदेत प्रवेश करायचा होता, पण फक्त दोघांनाच पास मिळाला. ललितनेच अमोल आणि नीलम संसदेबाहेर रंगांचा धूर सोडत असल्याचा व्हिडीओ बनवला होता. ललितने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला आहे. ललितकडे नीलम, अमोल, सागर आणि मनोरंजनाचे फोनही होते. नीलम हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. नीलमने MA, B.Ed, M.Ed, CTET, M.Phi आणि NET उत्तीर्ण केलं आहे.
पोलीस कर्मचारी नीलमला ताब्यात घेत असताना ती म्हणाली, भारत सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवतो तेव्हा आम्हाला मारहाण करून तुरुंगात टाकले जाते. आपल्यावर बळाचा वापर केला जातो. आम्ही कोणत्याही संघटनेशी संबंधित नाही. आम्ही विद्यार्थी आहोत आणि बेरोजगार आहोत. आमचे पालक मजूर म्हणून काम करतात, शेतकरी आहेत आणि काही छोटे दुकानदार आहेत. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हुकूमशाही चालणार नाही.
सूत्रांनी सांगितले की, दोन्ही आरोपी भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांच्या व्हिजिटर पासचा वापर करून सभागृहात पोहोचले होते. प्रताप सिम्हा मनोरंजनला ओळखत होते. संसदेच्या नवीन इमारतीला भेट देण्याच्या बहाण्याने त्याला पास दिला. तर अमोल हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे, तो पदवीधर आहे पण बेरोजगार आहे. तो प्लंबर म्हणून काम करायचा. त्याने पोलिसांना सांगितले की त्याने कल्याण येथून सुमारे 1,200 रुपयांना 5 रंग उडवणारे स्प्रे खरेदी केले होते.