पॉलीग्राफ टेस्ट उलगडणार संसद घुसखोरीचं रहस्य; आरोपींचं नार्को एनालिसिस, ब्रेन मॅपिंग करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:37 PM2024-01-05T13:37:27+5:302024-01-05T13:48:48+5:30
संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा, महेश कुमावत आणि अमोल शिंदे यांनी पॉलिग्राफ टेस्टसाठी होकार दिला आहे.
संसदेतील घुसखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची पॉलीग्राफ टेस्ट केली जाणार आहे. संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा, महेश कुमावत आणि अमोल शिंदे यांनी पॉलिग्राफ टेस्टसाठी होकार दिला आहे. आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी पॉलीग्राफ, नार्को एनालिसिस आणि ब्रेन मॅपिंगसाठी सहमती दर्शवली आहे, तर आरोपी नीलम आझादने पॉलीग्राफ टेस्टसाठी सहमती दर्शवली नाही.
अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवारी (5 जानेवारी) पूर्ण झाली. यानंतर पोलिसांनी सहाही आरोपी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि महेश कुमावत यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. यावेळी न्यायालयात पॉलीग्राफ टेस्टबाबत सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत 8 दिवसांची वाढ केली आहे.
पोलिसांनी सांगितलं का आवश्यक आहे पॉलीग्राफ टेस्ट?
दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पॉलीग्राफ, नार्को टेस्ट आणि आरोपीच्या ब्रेन मॅपिंगसाठीही अर्ज करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपीला कायदेशीर मदत करणाऱ्या वकिलाशी बोलण्यास सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी नष्ट केलेल्या मोबाईलचे सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत, तर काही डेटाही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अनेक तथ्ये आहेत जी आरोपींनी लपविण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत या सर्वांची मानसशास्त्रीय टेस्ट आवश्यक आहे. आम्हाला मनोरंजन आणि सागरची नार्को टेस्ट करावी लागेल.
कोठडी वाढविण्यास झाला विरोध
आरोपींच्या वकिलांनी कोठडी वाढवण्याच्या मागणीला विरोध केला. नीलम आझादच्या वकिलाने सांगितलं की, सोशल मीडिया डेटा तपासण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. काही पासवर्ड लपविल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. आरोपींच्या वतीने वकिलाने सांगितले की, पोलिसांनी ज्या पासवर्डची माहिती दिली नसल्याचा आरोप करत आहेत, त्या पासवर्डची माहिती पोलिसांनी न्यायालयाला सांगावी.