6 मोबाईलमध्ये संसदेतील कटाचे धागेदोरे; फोन घेऊन पळालेला मास्टरमाईंड उलगडणार रहस्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:25 PM2023-12-14T15:25:46+5:302023-12-14T15:37:58+5:30
चारही आरोपींचे मोबाईल ललितकडे असून तो अद्याप फरार आहे. मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तो सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.
संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींची सतत चौकशी सुरू आहे. बेरोजगारी, शेतकर्यांच्या समस्या आणि मणिपूरच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे सर्व केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र तपास यंत्रणा यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. आरोपींच्या मोबाईलची सविस्तर तपासणी करून त्यांचा नेमका काय हेतू आहे, याचा शोध घेतला जाईल. चारही आरोपींचे मोबाईल ललितकडे असून तो अद्याप फरार आहे. मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तो सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमोलने पोलिसांना सांगितलं की त्याने कल्याण येथून 1200 रुपयांना पाच रंगीत धूराचे स्प्रे विकत घेतले होते. सर्व आरोपींची विचारधारा एक सारखीच आहे. त्यामुळे त्यांनी सारख्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांना कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही संस्थेने पाठवलं होतं का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
या प्रकरणातील मास्टरमाईंडचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी छापेमारी केली जात आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कोलकाता येथील रहिवासी असलेला ललित झा हा शिक्षक असून तो या संपूर्ण घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की ते सोशल मीडियावर एकमेकांच्या संपर्कात आले होते, त्यानंतर सहाही जण फेसबुकवरील भगतसिंग फॅन पेजशी जोडले गेले.
ललित, सागर शर्मा आणि मनोरंजन वर्षभरापूर्वी म्हैसूरमध्ये भेटले होते, जिथे त्यांनी संसदेत प्रवेश करण्याची योजना आखली होती. नंतर त्याने नीलम आणि अमोल यांनाही सामील करून घेतले. या संपूर्ण प्रकरणाचे नेतृत्व ललित याने केलं. ललितचं शेवटचे लोकेशन राजस्थान-हरियाणा सीमेवरील नीमराना येथे सापडले. पोलिसांनी आधी सांगितले होते की, पाचही जण दहा डिसेंबरला जमले होते आणि गुरुग्राममधील विशाल शर्माच्या घरी थांबले होते. सध्या नीलम, मनोरंजन, अमोल आणि विशाल हे अटकेत आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी त्याची चौकशी केली.
ललित झा याने सर्वांना गुरुग्राममध्ये मीटिंगसाठी बोलावलं होतं. त्याने मोबाईलवर व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला होता. सध्या ललित झा हा या सर्वाचा सूत्रधार असल्याचं दिसत आहे. उर्वरित चौघे ललितच्या संपर्कात होते. सुनियोजित कटाचा भाग म्हणून ललित सर्वांचे फोन घेऊन फरार झाला. ललित मोबाईलमधील कटाशी संबंधित पुरावे नष्ट करू शकतो, अशी भीती पोलिसांना आहे. ललित झा याचं शेवटचं लोकेशन नीमरानाजवळ होतं.