संसद घुसखोरी प्रकरण: सहावा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, त्याच्यावर काय आरोप? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 02:55 PM2023-12-17T14:55:24+5:302023-12-17T14:56:18+5:30
Parliament Security Breach News: संसदेत घुसखोरी आणि स्मोक कँडल फोडल्याप्रकरणी पोलिसांनी सहाव्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Parliament Security Breach: 13 डिसेंबर रोजी संसदे घुसकोरी केल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे. महेश कुमावत(रा. नागौर, राजस्थान) असे या आरोपीचे नाव आहे. संसदेत घुसखोरी करण्यासाठी महेश गेल्या दोन वर्षांपासून अन्य आरोपींच्या संपर्कात होता. इतकंच नाही तर संसदेत घुसखोरी केल्यानंतर महेशनेच इतर आरोपींचे मोबाईलही नष्ट केले होते.
संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी दिल्लीपोलिसांनी यापूर्वीच अन्य पाच आरोपींना अटक केली आहे. सागर शर्मा, मनोरंजन गौडा, अमोल शिंदे, नीलम देवी आणि ललित मोहन झा, अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. सागर शर्मा आणि मनोरंजन गौडाने लोकसभे सभागृहात उडी मारुन गोंधळ घातला होता, यावेळी त्यांनी स्मोक कँडल फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तर, अमोल शिंदे आणि नीलम देवी संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते.
पाचवा आरोपी ललित मोहन झा, याने कथितरित्या संसदेबाहेर होणाऱ्या निषेधाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. ललित झा वगळता बाकीच्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. ललित झा आणि महेश कुमावत नंतर स्वत: पोलिसांना शरण आले. इतर आरोपींची बरीच माहिती समोर आली आहे, पण महेश कुमावत कोण आहे, हे जाणून घेऊया.
कोण आहे महेश कुमावत?
मीडिया रिपोर्टनुसार, 13 डिसेंबर रोजी महेश कुमावत दुसऱ्या गेटवर स्मोक कँडल घेऊन उभा राहणार होता, पण तो दिल्लीत येऊ शकला नाही. इतर आरोपींसोबत महेशदेखील या कटात महत्वाचा आरोपी आहे. शनिवारीच महेशला चौकशीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. ही योजना यशस्वी करण्यासाठी महेश गेल्या दोन वर्षांपासून आरोपींच्या संपर्कात होता. पुरावे नष्ट करुन त्याने आरोपींना मदतही केली. या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी महेशची चौकशी करण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.