संसद घुसखोरी प्रकरण: 'अमित शाह का बोलत नाहीत?' विरोधकांच्या टीकेवर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 07:03 PM2023-12-15T19:03:46+5:302023-12-15T19:04:28+5:30

Parliament Security Breach: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्ने यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

Parliament Security Breach: Parliament intrusion case: 'Why isn't Amit Shah talking?' BJP's counterattack on opposition's criticism, said... | संसद घुसखोरी प्रकरण: 'अमित शाह का बोलत नाहीत?' विरोधकांच्या टीकेवर भाजपचा पलटवार

संसद घुसखोरी प्रकरण: 'अमित शाह का बोलत नाहीत?' विरोधकांच्या टीकेवर भाजपचा पलटवार

Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आज, सलग दुसऱ्या दिवशीही लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ सुरू होता. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहात कोणतेही महत्त्वाचे काम होऊ शकले नाही आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षांने गृहमंत्री अमित शाह यांनी बोलण्याची आणि चर्चेची मागणी केली.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या या गंभीर प्रश्नावर आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. संसद आणि खासदारांच्या सुरक्षेबाबत केलेल्या गंभीर त्रुटींबद्दल विरोधी पक्षाच्या खासदारांना बेकायदेशीरपणे निलंबित करणे हा कोणता न्याय आहे? देशाचे गृहमंत्री टीव्हीवर मुलाखती देऊ शकतात, पण संसदेच्या पटलावर बोलू शकत नाहीत. अमित शाह यांनी संसदेत या मुद्द्यावर बोलावे आणि त्यानंतर दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे.

घुसखोरी करणारे दोन तरुण भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रताप सिम्हा यांच्या 'पास'वरुन संसदेत घुसले होते. त्यामुळे काही विरोधी नेते सिम्हा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. 

यावर सरकार काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर विरोधक सभागृहाचे कामकाज थांबवण्याचे निमित्त शोधत आहेत. सभागृहाच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यांच्या सूचना घेतल्या आणि (सुरक्षेत) सुधारणा करण्याचे आश्वासनही दिले आहे. विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय,अशी टीका त्यांनी केली.

विरोदी खासदारांचे निलंबन
गुरुवारी संसदेत मोठा गदारोळ झाला. यामुळे लोकसभेच्या 13 आणि राज्यसभेच्या एका खासदाराला हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. याविरोधात आज संसदेच्या संकुलात विरोधी पक्षांनी निदर्शने केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही यात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, लोकसभेतून काँग्रेसचे व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद, मणिकम टागोर, टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे, डीएमकेच्या कनिमोझी, सीपीआय(एम)चे एस व्यंकटेशन आणि पीआर नटराजन आणि सीपीआयचे के. सुब्बारायन यांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Parliament Security Breach: Parliament intrusion case: 'Why isn't Amit Shah talking?' BJP's counterattack on opposition's criticism, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.