"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:30 PM2024-07-02T17:30:00+5:302024-07-02T18:01:35+5:30
केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ४०० पारच्या घोषणेबाजीवरही निशाणा साधला.
नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी सुद्धा चर्चा सुरूच होती. यावेळी डीएमकेच्या खासदार डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांच्यासह अनेक खासदारांनी आपल्या पक्षांची बाजू सभागृहात मांडली. तसेच, केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ४०० पारच्या घोषणेबाजीवरही निशाणा साधला.
"अब की बार ४०० पार" ही भाजपची घोषणा "अब की बार चोको बार" झाली आहे, असे म्हणत राज्यसभा खासदार डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी सभागृहात अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. त्या म्हणाला, "भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी 'अब की बार ४०० पार'चा नारा दिला होता, पण तो नारा 'अब की बार चोको बार' असा निघाला. जोपर्यंत तो संपत नाही, तोपर्यंत भाजपने त्याचा आनंद घ्यावा."
याचबरोबर, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनीही पेपरफुटीप्रकरणी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, पेपरफुटी प्रकरणामुळे देशात रक्तपात होत आहे. देशातील विविध परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच, राज्यांसोबत भेदभाव आणि विरोधी नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात असल्याचा आरोप डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू यांनी राज्यसभेत केला.
दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षांनी मंगळवारी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. अहंकाराने देश चालवता येत नाही, असा दावा विरोधी पक्षांनी केला. तसेच, लोकशाहीत विरोधकांची भूमिका ठाम असते. मात्र विरोधक आणि मीडिया त्यांना 'तुकडे तुकडे गँग, खान मार्केट गँग आणि लुटियन्स गँग' म्हणत बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सत्ताधाऱ्यांवर केला.