‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:41 PM2024-07-02T13:41:06+5:302024-07-02T13:41:24+5:30
Parliament Session 2024: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उत्तर प्रदेशमध्ये झालेला पराभव तसेच रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा ज्या फैजाबाद मतदारसंघात समावेश होतो तिथे भाजपाला बसलेला पराभवाचा धक्का चर्चेचा विषय ठरलेला आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. अयोध्येतील विजय हा भारतीय जनतेच्या परिपक्वतेचा विजय आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच ‘होई वही जो राम रचि राखा’, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी भाजपाला सुनावले.
जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर उत्तर प्रदेशात भाजपाला त्याचा फायदा होऊन मोठं यश मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या इंडिया आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला होता. त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी एका कवितेच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं. हा त्यांचा (देवाचा) निर्णय आहे, ज्यांच्या काठीला आवाज नसतो, असा टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. ते पुढे म्हणाले की, जे कुणाला आणल्याचा दावा करत होते. ते स्वत:च आज कुणाच्यातरी आधारासाठी लाचार झाले आहेत, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, संविधान हीच संजीवनी आहे. तसेच संविधानाचा विजय झाला आहे. संविधानाच्या रक्षणकर्त्यांचा विजय झाला आहे. हे सरकार चालणार नाही तर लवकरच कोसळणार आहे. आता उत्तर प्रदेशच्या जनतेला एवढाच आग्रह आहे की, ज्या गंगेचं पाणी घेऊन सत्य बोलण्याची शपथ घेतली जाते, ते गंगाजल घेऊन किमान खोटं बोलू नये. विकासाचे ढोल बडवणारे विनाशाची जबाबदारी कधी घेणार? मंदिराचं गळणारं छत आणि रेल्वे स्टेशनची कोसळलेली भिंत यांनी भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्ही जे रस्ते बांधले होते. त्यावर विमानं उतरली होती. आता उत्तर प्रदेशमधील मुख्य शहरातील रस्त्यांवर होड्या फिरत आहेत. आता आणखी पाऊस पडला तर होडीमधूनच प्रवास करावा लागेल. स्मार्ट सिटीच्या आश्वासनांचीही अशीच अवस्था झालेली आहे. मागच्या १० वर्षांमधील एकमेव कामगिरी म्हणजे परीक्षा माफियांचा झालेला जन्म हीच आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.