संसद अधिवेशन : कोरोना चाचणीसाठी खासदारांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 05:13 AM2020-09-13T05:13:15+5:302020-09-13T05:13:43+5:30
विमानतळावर कोरोना चाचणीची तयारी केली आहे. दिल्लीत आल्यानंतरही खासदारांना कोरोना चाचणी करता येईल.
नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटाखाली सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनासाठी खासदारांची कोरोना चाचणीसाठी धावपळ सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप खासदारांना कोरोना चाचणी करण्याची सूचना केंद्रीय व प्रदेश नेतृत्वाने दिल्या असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत सर्व खासदार दिल्लीत दाखल होतील. कोरोनातून बरे झालेले खासदार मात्र अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.
जिल्हास्तरावर प्रत्येक खासदाराने कोरोना चाचणी केली आहे. तरीदेखील संसदेत येणाºया प्रत्येक खासदाराचे तापमान तपासले जाईल. एम्स, सफदरजंग रुग्णालयातदेखील खासदारांच्या कोरोना चाचणीची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे अधिवेशनाला दोन दिवस असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालय व हवाई वाहतूक मंत्रालयाने दिल्ली
विमानतळावर कोरोना चाचणीची तयारी केली आहे. दिल्लीत आल्यानंतरही खासदारांना कोरोना चाचणी करता येईल. जास्तीत जास्त खासदारांनी मतदारसंघात चाचणीस प्राधान्य दिले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व रावसाहेब दानवे यांनी
चाचणी केली आहे. शिवसेना खासदारदेखील चाचणी करीत आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, लोकसभेतील नेते विनायक राऊत, धैर्यशील माने याही खासदारांनी कोविड चाचणी केली.
भाजप खासदारांना उपस्थितीचा आग्रह नेत्यांनी धरला आहे. काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, तसेच विधेयकावर मतदान घ्यायचे असल्यास तशी पूर्वसूचना खासदारांना दिली जाईल. शिवसेना खासदारांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, राहुल शेवाळे यांनी अधिवेशनासाठी कोरोना चाचणी केली आहे.
पत्रेही पाठविण्यात आली : सर्व केंद्रीय मंत्र्यांनीदेखील कोरोना चाचणी केली. एकूण अठरा दिवस अधिवेशन चालेल. त्यादरम्यान कुणाही खासदारास कोरोनाची लक्षणे आढळल्यास एम्स, सफदरजंग व राम मनोहर लोहिया रुग्णालयात चाचणी केली जाईल. तसे पत्रही खासदारांना पाठवण्यात आले आहे.