शिवसेनेच्या दोन खासदारांसह राज्यसभेत गदारोळ केल्याप्रकरणी १२ जणांचं निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 03:46 PM2021-11-29T15:46:21+5:302021-11-29T16:17:39+5:30
पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळाप्रकरणी हिवाळी अधिवेशनात कारवाई
नवी दिल्ली: राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.
The 12 Rajya Sabha MPs have been suspended for indiscipline in the last session of the House.
— ANI (@ANI) November 29, 2021
The House has been adjourned till tomorrow, 30th November
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या एकूण १२ सदस्यांना निलंबित करण्यात आलं. ही कारवाई हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे १२ खासदारांना आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
कोण कोण निलंबित?
१. एलामरम करीम (सीपीएम)
२. फुलो देवी नेताम (काँग्रेस)
३. छाया वर्मा (काँग्रेस)
४. रिपुन बोरा (काँग्रेस)
५. बिनय विश्वम (सीपीआय)
६. राजामणी पटेल (काँग्रेस)
७. डोला सेन (तृणमूल)
८. शांता छेत्री (तृणमूल)
९. सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस)
१०. प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)
११. अनिल देसाई (शिवसेना)
१२. अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस)
पावसाळी अधिवेशनात काय घडलं होतं?
११ ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली. लोकसभेत केवळ २१ टक्के, तर राज्यसभेत केवळ २८ टक्के कामकाज झालं.