'सरकारला प्रश्न विचारल्यानं खासदारांना निलंबित केलं'; शरद पवारांनी कारवाई मागचं कारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:28 PM2023-12-21T13:28:47+5:302023-12-21T13:31:57+5:30
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.
Parliament Winter Session 2023 ( Marathi News ) : नवी दिल्ली- संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून १४३ खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनीही यावरुन भाजपवर जोरदार टीका करत कारवाई मागचं कारण सांगितलं.
"संसदेचे सदस्य नसताना काही लोक सदनमध्ये आले, या लोकांना पास कुठून मिळाला. ते सदनमध्ये कसे आले? याबाबत सरकारकडून माहिती मिळण्याची आवश्यक्ता होती. सदनचा तो अधिकार होता, आम्ही स्टेटमेंटची मागणी केली होती तेच त्यांनी दिलेली नाही. यामुळेच सदनमधील सदस्यांना निलंबित केलं, आजपर्यंत अशी गोष्ट कधीही झालेली नाही, असा आरोप खासदार शरद पवार यांनी आज केला.
उच्च शिक्षण मंत्र्यांना न्यायालयाचा दणका! के पोनमुडी यांना ३ वर्षांची शिक्षा, ५० लाखांचा दंड!
खासदार शरद पवार म्हणाले, सध्या विरोधी पक्षाला दुर्लक्ष करुन काम करणे सुरू आहे. पण, देशाची जनता हे सर्व पाहत आहे. जी मिमिक्री केली ती सदनच्या बाहेर केली आहे. संसदेत बोलू दिले जात नाही. खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केलं. खासदारांचं असं निलंबन करणं चुकीचं आहे, असंही खासदार पवार म्हणाले.
"निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाता येणार नाही"
लोकसभेने आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन केले आहे. या खासदारांविरोधात आता आणखी एक कारवाई केली आहे. मंगळवारी लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास मनाई केली आहे.
लोकसभेतून एकूण ९५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर ४६ खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. संसदेच्या कामकाजानंतर, इंडिया आघाडीने शुक्रवारी देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाच्या मागणीवर ठाम आहेत आणि गदारोळ माजवत आहेत.