Parliament Winter Session: जया बच्चन म्हणाल्या, "सर सर म्हणत ओरडत आहे, आता मी तुम्हाला मॅडम म्हणेन"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 04:16 PM2023-12-20T16:16:47+5:302023-12-20T16:17:19+5:30
सकाळपासून आरडाओरडा करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे.
Parliament Winter Session ( Marathi News ) : नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी आणि खासदारांचे निलंबन या दोन मुद्द्यांवरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या (20 डिसेंबर) 13 व्या दिवशीही गदारोळ झाला. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी म्हटले आहे की, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आपले ऐकत नाहीत. सकाळपासून आरडाओरडा करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे.
खासदारांना कोणत्या निकषाखाली निलंबित करण्यात आले, यावरही जया बच्चन यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, दुसऱ्याच दिवशी अनेक खासदार वेलमध्ये गेले, पण त्यांना निलंबित करण्यात आले नाही, त्यामुळे कोणत्या निकषावर खासदारांना निलंबित केले जात आहे, हे सभापतींनी सांगावे. "आम्ही बोलतोय, आम्ही ओरडतोय की सर, आम्हाला बोलू द्या. मी त्यांना म्हणाले की, सर-सर म्हणत आहे आणि ते उत्तर देत नाहीत. आता मी तुम्हाला मॅडम म्हणेन", असे जया बच्चन गमतीने म्हणाल्या.
पुढे म्हणाल्या की, "काल तुम्ही अनेक खासदारांना निलंबित केले. कोणी फलक धरले तर कोणी वेलमध्ये गेले. आजही अनेक लोक वेलमध्ये गेले, त्यांना तुम्ही निलंबित का केले नाही? त्यामुळे यांना निलंबित करायचे, त्यांना करायचे नाही, यामागील तुमचा निकष काय आहे, असे मी सभापतींना विचारत होते." याचबरोबर, जया बच्चन म्हणाल्या, 'जरा विचार करा, राम गोपालसारखे ज्येष्ठ खासदार आपल्या जागेवरून उठले आणि बाजूला गेले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी कधीही मोठ्याने आवाज केला नाही, वाईट बोलले नाहीत किंवा सभापतींनी त्यांची वेळ संपल्याचे सांगितल्यावर ते भाषण पूर्ण न करता बसले आहेत. अशा ज्येष्ठ खासदाराला तुम्ही निलंबित केले आहे. याचा विचार करा. हा कोणता निकष आहे? असा सवाल जया बच्चन यांनी केला.
खासदाराने केली उपराष्ट्रपतींची मिमिक्री
संसदेत झालेल्या घुसखोरीवरून आक्रमक भूमिका मांडणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा सपाटा सुरू आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत मागील काही दिवसांत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात काल विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनादरम्यान टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. कल्याण बॅनर्जी यांनी सभापतींची मिमिक्री केली, त्यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. राहुल गांधी या मिमिक्रीचा व्हिडिओ काढताना दिसले. आज संसद परिसरात राहुल गांधी दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी सदर प्रकरणावर प्रश्न विचारला. यावर मी यावर भाष्य करणार नाही, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं.