"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:28 PM2024-12-03T18:28:47+5:302024-12-03T18:29:30+5:30
"यानंतर गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांना त्यांच्या नावाने असलेली कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवायची होती. मात्र, त्यांना काही अडचण आल्याने इतर मंत्री त्यांना सांगत होते. यावर बिर्ला म्हणाले, एकमेकांना समजावून सांगू नका. बिर्ला यांनी मेघवाल यांनाच संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले."
लोकसभेत मंगळवारी शून्य प्रहराला सुरुवात होण्यापूर्वी, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विषयपत्रिकेत नमूद विविध मंत्र्यांची नावे असलेला दस्तऐवज सादर केला असता, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, संबंधित मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित रहायला हवे. सभागृहातील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर, दुपारी 12 वाजता विषयपत्रिकेत नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित मंत्र्यांकडून सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात.
ज्यावेळी संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसतात, तेव्हा सर्वसाधारणपणे संसदीय कामकाज राज्यमंत्री त्यांच्या वतीने संबंधित कागदपत्रे सादर करतात. आज सभागृहात आवश्यक कागदपत्रे सादर करताना वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद उपस्थित नसल्याने, संसदीय कामकाज राज्यमंत्री मेघवाल यांनी त्यांच्या वतीने त्यांच्या नावाने असलेली कागदपत्रे सादर केली. यावेळी बिर्ला म्हणाले, उद्योगमंत्री पियुष गोयल सभागृहात बसले आहे. त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगायला हवे होते.
...म्हणून नाराज झाले लोकसभा अध्यक्ष -
यानंतर गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांना त्यांच्या नावाने असलेली कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवायची होती. मात्र, त्यांना काही अडचण आल्याने इतर मंत्री त्यांना सांगत होते. यावर बिर्ला म्हणाले, एकमेकांना समजावून सांगू नका. बिर्ला यांनी मेघवाल यांनाच संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले.
यानंतर मेघवाल यांनी ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांच्या नावाची कागदपत्रेही सादर केली. यावर सभापती बिर्ला नाराजी व्यक्त करत म्हणाले, "संसदीय कामकाज मंत्री जी, ज्या मंत्र्यांची नावे विषयपत्रिकेत आहेत ते सभागृहात उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करा. अन्यथा सर्व उत्तरं आपणच द्या. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे देखील सभागृहात उपस्थित होते.