संसदीय समिती करणार ईव्हीएम प्रकरणाची चौकशी
By admin | Published: March 15, 2017 04:09 AM2017-03-15T04:09:11+5:302017-03-15T04:09:11+5:30
बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली
हरीश गुप्ता , नवी दिल्ली
बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली तरी संसदीय स्थायी समितीने याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीमधील मतदान यंत्रांत हेराफेरी झाल्याच्या तक्रारींची ही समिती चौकशी करणार आहे.
‘लोकमत’शी बोलताना गृह विभागाच्या समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध शहरे व जिल्ह्यांतून याबाबत तक्रारी आल्या आहेत. तसेच याचे पुरावेही पाठविण्यात आले आहेत. विशेषत: पुणे, नाशिक, धुळे व इतरही ठिकाणांहून अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एका उमेदवाराने तर अशी तक्रार केली आहे की, जिल्हा परिषदेसाठी माझ्या कुटुंबात २८ सदस्य आहेत. तरीही मतदान यंत्राने मला एकही मत पडल्याचे दाखवले नाही. समिती या तक्रारी एकत्रित करीत आहे व माहितीची शहानिशा केली जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी समितीच्या संपर्कात आहेत व बारकावे तपासत आहे. याबाबत अधिक काही बोलण्यास नकार देत शर्मा म्हणाले की, आम्ही आता चौकशी करीत आहोत. मतदान यंत्रात केलेल्या प्रत्येक मताची कागदी नोंद ठेवली जावी, या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबतही समिती विचार करणार आहे. तथापि, ही समिती उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात हेराफेरी झाल्याच्या एकाही आरोपाची चौकशी करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमप्रणालीचा तपास करणारी स्थायी समिती मतदान यंत्रातील हेराफेरीच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक अभियंते, पुरवठादार आणि तज्ज्ञांची मदत घेणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आगामी एमसीडी निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली आहे.