संसदेचे बजेट अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू!
By admin | Published: January 4, 2017 05:49 AM2017-01-04T05:49:33+5:302017-01-04T08:34:57+5:30
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरू होत पहिले सत्र ९ फेब्रुवारीपर्यंत चालेल आणि १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प व त्याला जोडूनच रेल्वे अर्थसंकल्पही सादर होईल.
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरू होत पहिले सत्र ९ फेब्रुवारीपर्यंत चालेल आणि १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प व त्याला जोडूनच रेल्वे अर्थसंकल्पही सादर होईल. त्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षणही उभय सभागृहात सादर केले जाईल.
संसदीय कामकाज राजकीय व्यवहार समितीच्या मंगळवारच्या बैठकीत हा निर्णय झाला. प्रथमच २८ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून, गेल्या वर्षापर्यंत स्वतंत्रपणे सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्पही यंदा केंद्रीय अर्थसंकल्पाचा भाग असेल. नवे आर्थिक वर्ष सुरू होताना, अर्थसंकल्पविषयक सर्व प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात व केंद्रीय योजनांसाठी १ एप्रिलपासून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी असे केले जाणार आहे. जीएसटी कौन्सिलची दोन दिवसांची बैठक सुरू झाली असून, ती बुधवारपर्यंत चालेल. करदात्यांवर नियंत्रण नेमके कोणाचे या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीनंतर अरुण जेटली राज्यांच्या अर्थमंत्र्यांबरोबर बजेटपूर्व विचारविनिमय करतील.