पर्रीकर गोव्यात परतण्याची चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 06:27 AM2016-04-28T06:27:23+5:302016-04-28T06:27:23+5:30
मनोहर पर्रीकर पुन्हा गोव्याच्या राजकारणात येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंचने माध्यमप्रश्नी चालविलेले तीव्र आंदोलन, विविध कारणांवरून ख्रिस्ती मतदार व भाजपात निर्माण झालेला दुरावा, काही मतदारसंघांमध्ये पक्षाच्या विद्यमान आमदारांची व मंत्र्यांची कमकुवत झालेली स्थिती या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेतृत्व करण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा गोव्याच्या राजकारणात येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
पर्रीकर हे संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात काम करत असले, तरी दिल्लीत ते खूष नाहीत. त्यांना गोव्यात यायचे आहे, अशी चर्चा पक्षाच्या काही मंत्री, आमदारांमध्ये व पदाधिकाऱ्यांतही सुरू आहे. आता तर गोव्यात राजकीय स्थिती अशी आहे की, पर्रीकर गोव्याच्या राजकारणात पुन्हा परतलेले आम्हाला हवेच आहेत, असे भाजपाचे काही पदाधिकारी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगत आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली २०१७ सालची निवडणूक लढविल्यास भाजपाला किती जागा मिळतील, असा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच पडला आहे.
चार वर्षे सत्तेत राहूनही व गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी अशा योजनांच्या नावाखाली शासकीय निधीतून लोकांना दरमहा अर्थसाहाय्य दिल्यावरही पक्षाला निवडणुकीवेळी स्वबळावर लढण्याएवढा विश्वास कमावता आलेला नाही. त्यामुळेच मगोप आपल्यासोबत राहावा, असे भाजपाला वाटते. भारतीय भाषा सुरक्षा मंच व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाविरोधात माध्यमप्रश्नी आंदोलन तीव्र बनविल्यानंतर सरकारमध्ये अस्वस्थता वाढली. मंत्री राजेंद्र आर्लेकर, उपसभापती विष्णू वाघ आदींनी वेगळा सूर लावल्याने या अस्वस्थतेत भरच पडत आहे. (खास प्रतिनिधी)