परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या; एसआयटीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 08:35 PM2018-06-15T20:35:18+5:302018-06-15T20:52:56+5:30
गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांना मारण्यासाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली.
बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेनेच केल्याचा दावा विशेष तपास पथकानं केला आहे. परशुराम वाघमारे गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणातील सहावा आरोपी असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांना मारण्यासाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली.
गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पीटीआयला महत्त्वपूर्ण दिली. वाघमारेनेच गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडली, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. 'गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलानंच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याचंदेखील फॉरेन्सिक तपासातून सिद्ध झालं आहे. या तिन्ही व्यक्तींवर झाडण्यात आलेल्या गोळीच्या मागच्या बाजूला एकाच प्रकारची खूण आढळून आली आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारसरणीसाठी काम करणारी एक कट्टरपंथी टोळी सक्रीय आहे. त्या टोळीनेच कलबुर्गी, पानसरे आणि लंकेश यांची हत्या घडवून आणली, असं या अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं. या टोळीत 60 जण सक्रीय असून त्यापैकी बरेचजण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं. मात्र या हत्यांशी या संघटनांचा थेट संबंध असल्याचे पुरावे अद्याप मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली.