कंदाहार विमान अपहरणात होता पाक गुप्तचर संघटनेचा सहभाग
By admin | Published: January 16, 2017 04:51 AM2017-01-16T04:51:35+5:302017-01-16T04:51:35+5:30
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला
नवी दिल्ली : इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या २४ डिसेंबर १९९९ रोजी झालेल्या अपहरणामागे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला आहे. या विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते आणि प्रवाशांच्या सुटकेसाठी भारताला मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती.
कंदाहार विमान अपहरण नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घटनेत ओलीस ठेवण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटेकसाठी जी बोलणी सुरू होती, त्यात अजित डोवाल होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे भारतातील माजी ब्युरोप्रमुख मायरा मॅकडोनाल्ड यांनी लिहिलेल्या पुस्तकात डिफीट इज अॅन आॅर्फन : हाऊ पाकिस्तान लॉस्ट द ग्रेट साउथ एशियन वॉर हे पुस्तक लिहिले असून, त्यातील कंदाहार विमान अपहरण प्रकरणात डोवाल यांच्या मुलाखतीचा भाग आहे. त्यांनी अपहरणात आयएसआयचा सहभाग होता, असे म्हटले आहे.
अपहरणकर्त्यांना आयएसआयचा पाठिंबा होता. तसा नसता, तर प्रवाशांची सुटका करणे सोपे झाले असते. आम्ही अपहरणकर्त्यांशी बोलणी करायला कंदाहारला पोहोचलो, तेव्हा विमानतळाच्या परिसरात अनेक शस्त्रधारी तालिबानी दहशतवादी दिसत होते. आम्ही अपहरणकर्त्यांशी चर्चा करायला पोहोचलो, तेव्हाच आम्हाला यात आयएसआयचा हात असल्याचे लक्षात आले. विमानाजवळच दोन आयएसआयचे अधिकारी होते. त्यापैकी एक लेफ्टनंट कर्नल तर दुसरा मेजर दर्जाचा होता. अपहरणकर्ते प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. आम्ही अपहरणकर्त्यांवर दबाव आणत होतो. पण आयएसआयमुळे त्यात अडचणी येत होत्या, असे डोवाल मुलाखतीत म्हणतात. त्यांची सुटका झाल्यानंतरच हे अपहरण नाट्य संपुष्टात आले, हे सर्वज्ञात आहे. दहशतवाद्यांना सोडल्याबद्दल अटलबिहारी
वाजपेयी सरकारवर त्यावेळी टीकाही झाली होती. मसूद अझहर हे पाकिस्तानातील जैश-ए-महमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून, भारतातील अनेक हल्ल्यांमागे
त्याचा हात असल्याचे आढळन आले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, यासाठी भारत
संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रयत्नशील
असून, दरवेळी त्यात चीन खोडा घालत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>म्हणून करावी लागली सुटका
विमानातील १७८ प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक झरगार या तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची अट आम्हाला घातली.त्यांना सोडण्याची भारताची अजिबात तयारी नव्हती. पण अडकलेल्यांची सुटका करणे हे आव्हान होते. दहशतवाद्यांची सुटका केली नसती, तर प्रवाशांच्या जीवाला धोका होता.
अखेर या तीन दहशतवाद्यांना विशेष विमानाने भारतातून कंदाहारला आणून त्यांची सुटका करावी लागली, याचा त्यांनी उल्लेख केला आहे.