पक्षांनी खासदारांना आचारसंहिता लावावी- व्यंकय्या नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:44 AM2019-08-10T01:44:00+5:302019-08-10T01:44:21+5:30
पावसाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत समाधानी
नवी दिल्ली : आपल्या खासदारांनी संसदेत कसे वागावे याबाबत सर्व पक्षांनी आचारसंहिता लागू करण्याची गरज आहे असे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर शुक्रवारी नायडू पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, संसदेत खासदारांनी कसे वागावे याबाबतच्या आचारसंहितेचा सर्व राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्येही आवर्जून उल्लेख करायला हवा.
राज्यसभेत ३७० कलमाचा प्रस्ताव मांडल्यानंतर निषेध म्हणून पीडीपीच्या एका खासदाराने राज्यघटनाच फाडली होती. या पक्षाच्या आणखी एका खासदाराने स्वत:चा सदराच फाडला. दुसऱ्या दिवशी लोकसभेत हा प्रस्ताव सादर झाल्यावर गदारोळाची पुनरावृत्ती झाली. तिथेही हा प्रस्ताव संमत झाला. महत्त्वाची विधेयके चर्चेस आली असताना संसदेच्या कामकाजात अडथळे आणणाऱ्यांबद्दल राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.