फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय: अमित शाह, प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:29 AM2023-08-15T05:29:54+5:302023-08-15T05:30:18+5:30
अनेक लोक अजूनही या भयावहतेचा सामना करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी सोमवारी ‘फाळणी शोकांतिका स्मृती’ दिनानिमित्त देशाच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. १९४७ मधील धर्माच्या आधारावरील फाळणी हा ‘काळा अध्याय’ असल्याचे शाह म्हणाले.
यातून निर्माण झालेल्या द्वेषाने लाखो लोकांचा बळी घेतला व कोट्यवधी लोकांना विस्थापित केले, असेही ते म्हणाले. त्यांनी सोशल नेटवर्किंग साइट ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर लिहिले, “देशाला याची मोठी किंमत चुकवावी लागली.
अनेक लोक अजूनही या भयावहतेचा सामना करीत आहेत. फाळणीत प्राण गमावलेल्या सर्वांना मी नमन करतो.” भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “१९४७ च्या या काळ्या दिवशी देशाचे दोन तुकडे होऊन लाखो लोक बेघर झाले होते. हिंसाचार शिगेला पोहोचला होता. या क्रूर घटनेत प्राण गमावलेल्या लोकांना विनम्र अभिवादन.” देशाची फाळणी हा भारतीय इतिहासातील अमानवी अध्याय असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (वृत्तसंस्था)