...म्हणून आम्ही दिल्लीला आलोय; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 06:02 PM2021-11-26T18:02:51+5:302021-11-26T18:03:15+5:30
सर्व राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खुलासा केला आहे.
नवी दिल्ली – राज्यातील प्रमुख नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सत्तांतर होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबत केलेल्या भविष्यवाणीनं अनेकांच्या भूवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नियोजित दौरा सोडून दिल्लीला रवाना झाल्याने चर्चेची खलबतं सुरु झाली.
परंतु या सर्व राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खुलासा केला आहे. मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीसाठी आलो आहे. याठिकाणी आमचे संघटनमंत्री आणि इतर सहकारी यांच्यासोबत ४-५ तास बैठक झाली. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आला. त्यामुळे बाकी कुठलाही अजेंडा आमचा नाही. कुठली राजकीय चर्चा बाहेर सुरू आहे याची कल्पना नसल्याचं ते म्हणाले.
त्याचसोबत मी नारायण राणे यांनी काय विधान केले आहे हे ऐकलं नाही. दिल्लीत आल्यावर आम्ही अमित शाह यांची भेट घेतली. कारण ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा होते. ते आम्हाला मार्गदर्शन करतात असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला काही चमत्कार होईल अशी आशा वाटते परंतु असं काही घडणार नाही. याठिकाणी भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आम्ही दिल्लीत!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 26, 2021
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांची माहिती..@ChDadaPatilpic.twitter.com/DPtlhnqrC9
काय म्हणाले नारायण राणे?
"लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपा(BJP) सरकार सत्तेत येईल. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तोदेखील दिसून येईल. मार्च महिन्यापर्यंत बदल दिसून येतील," असं केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी विधान केले आहे. "जे काही आहे ते सर्व आता सांगता येणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार स्थापन करायचं असेल तर गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात," असंही राणेंनी यावेळी नमूद केलं.
राणेंनी जास्तच मुदत दिली
गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे आभार मानतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला. आतापर्यंत भाजपाच्या नेत्यांनी पाच - सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो. त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं अशी टीकाही जयंत पाटील(Jayant Patil) यांनी केली.
राज्यातील प्रमुख नेते दिल्लीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) शुक्रवारी सर्व कार्यक्रम रद्द करत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून पवार दिल्लीला गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केल्यानं नेमकं राज्याच्या राजकीय वर्तुळात काय सुरु आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.