लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर सुरू होती पार्टी, सैन्यातील 3 जवानांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 04:15 PM2020-07-20T16:15:03+5:302020-07-20T16:15:48+5:30
स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळावरुन जाऊन सैन्यातील जवान राकेश कुमार, गणेश सिंह, अगस्ती स्वयंन घोष यांना अटक केली.
उत्तराखंड येथे राजभवन जवळील किमाडी ते मसूरी रस्त्यावर पार्टी करणाऱ्या सैन्यातील तीन जवानांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही जवानांवर गावकऱ्यांना मारहाण केल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संचारबंदी असतानाही रस्त्यावर फिरत असल्याने आणि भांडण केल्यामुळे या जवानांवर कारवाई करण्यात आली आहे.
कैंट कोतवाली प्रभारी उप-निरीक्षक संजय मिश्रा यांनी माहिती देताना सांगितले की, नेहरु कॉलनी येथील रहिवाशी पंकज पटवाल हे रविवारी रात्री उशिरा किमारी-मसूरी रस्त्यावरुन जात होते. त्यावेळी, त्याच रस्त्यावर पार्टी करणाऱ्या तीन जवानांशी त्यांची गाठ पडली. मात्र, पंकज व त्यांच्या साथीदारांना या सैन्यातील जवानांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप पंकज यांनी केला आहे. विशेष म्हणजे शेजारील गावकऱ्यांना घटनास्थळावरुन पोहोचून तत्काळ येथील रहिवाशांची सुटका केल्याचं सांगण्यात येतं.
स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळावरुन जाऊन सैन्यातील जवान राकेश कुमार, गणेश सिंह, अगस्ती स्वयंन घोष यांना अटक केली. सध्या या तिन्ही आरोपींना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येईल. यासंदर्भात अधिक तपास सुरु असल्याचेही पोलीस अधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान, डेहरादून जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचने येथे पुन्हा संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. रविवारी रात्री आणखी 58 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सैन्याचे 13 जवान आणि सीआयएसएफच्या जवानांचाही समावेश आहे.