पासी समाजाचे ताडी प्या आंदोलन
By admin | Published: April 19, 2016 03:11 AM2016-04-19T03:11:32+5:302016-04-19T03:11:32+5:30
बिहारमध्ये दारूबंदी केल्यापासून विविध स्तरांवरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका होत आहे. त्यातच ताडीवरही बंदी घातल्याच्या वृत्तामुळे तेथील पासी समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे
एस. पी. सिन्हा, पाटणा
बिहारमध्ये दारूबंदी केल्यापासून विविध स्तरांवरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका होत आहे. त्यातच ताडीवरही बंदी घातल्याच्या वृत्तामुळे तेथील पासी समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. पासी समाजाने सोमवारी त्यास विरोध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले. पाटण्याच्या गांधी मैदानात पासी समाजाच्या शेकडो लोकांनी जाहीरपणे ताडी पिण्यास सुरुवात केल्याने पोलिसांची धावपळच उडाली.
या समाजाने आधी ताडीबंदी विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी हजारो लोक गांधी मैदानात जमले. त्यापैकी शेकडो लोकांनी अचानक ताडी प्यायला सुरुवात केली. काही जण असा प्रकार करतील, असा पोलिसांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात ताडी पिणाऱ्यांची संख्या खूपच मोठी होती. वास्तविक बिहारमध्ये ताडीवर बंदी घालण्यात आली नसून, ताडीची सार्वजनिक ठिकाणी विक्री करण्यासंबंधात नव्याने नियम करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र या नियमांना ताडी व्यापाऱ्यांचा विरोध आहे.