विमानातच योगा करत होता प्रवासी; ऐकला नाही म्हणून तिकिटाचे पैसे देत उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:02 PM2019-11-06T18:02:24+5:302019-11-06T18:02:51+5:30
गुणासेना वाराणसीहून प्रवास करत होता.
चेन्नई : कोलंबोसाठी उड्डाण करणाऱ्या विमानामध्ये आज एक घटना घडली आहे. एका श्रीलंकेच्या नागरिकाला चेन्नई विमानतळावर जबरदस्ती उतरविण्यात आले. त्याच्यावर विमानात योगा करणे आणि कसरती करण्याचा आरोप करण्यात आला होता.
या श्रीलंकेच्या नागरिकाचे नाव गुणासेना असे आहे. तो वाराणसीहून प्रवास करत होता. स्पाईस जेटच्या विमानातील कर्मचाऱ्यांनी गुणासेनाला योगा न करण्याची वारंवार सूचना केली होती. मात्र, त्याने कर्मचाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होऊ लागला होता. अखेर कर्मचाऱ्यांनी गुणासेनाला सीआयएसएफ जवानांच्या मदतीने विमानातून उतरविले. तसेच त्याचे विमानभाडेही परत केले.
पोलिसांनी गुणासेनाविरोधात तक्रार दाखल केलेली नसून त्याला श्रीलंकेच्या उच्चायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्याकडे श्रीलंका आणि अमेरिका अशा दोन देशांचा पासपोर्ट होता.