कर्नाटक बसच्या तिकिटांवर महाराष्ट्राचे चिन्ह पाहून प्रवाशांमध्ये संताप, सरकारने दिले कारवाईचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:53 PM2022-10-06T17:53:57+5:302022-10-06T17:55:05+5:30
कर्नाटक बसच्या तिकिटांवर महाराष्ट्राचे चिन्ह पाहून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला.
बंगळुरू : बंगळुरूमध्ये डोनी ते गडग प्रवास करणाऱ्या बस प्रवाशांनी तिकिटांवरमहाराष्ट्र राज्य परिवहन (MRTC) चे चिन्ह पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. तिकिटावरमहाराष्ट्र परिवहनच्या चिन्हासह 'जय महाराष्ट्र' असे लिहिले होते. या संपूर्ण घटनेमुळे गडग येथे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांच्या गटाने सरकारचा निषेध केला. त्यानंतर राज्य सरकारने कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल गडग डेपोच्या परिवहन अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
डोनीहून काही प्रवासी गडगच्या दिशेने कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (NWKRTC) बसने प्रवास करत होते. यादरम्यान बसमधील कंडक्टरने प्रवाशांना जे तिकिट दिले त्यावर महाराष्ट्र परिवहन मंडळाचे चिन्ह होते. याशिवाय त्या तिकिटावर जय महाराष्ट्र असे देखील लिहले होते, यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले. याबाबतची माहिती प्रवाशांनी स्थानिक कामगार व परिवहन अधिकाऱ्यांना दिली. याशिवाय त्यांनी ही तिकिटे सोशल मीडियावर व्हायरल देखील केली आहेत.
राज्य सरकारने दिले कारवाईचे आश्वासन
हे प्रकरण तापल्यानंतर NWKRTC ने मुंद्रागी तालुक्यातील डोनी आणि गडग दरम्यानच्या मार्गासाठी 70 तिकीट रोल मागे घेतले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत NWKRTC च्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, हीच एजन्सी कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या तिकिटांचे रोल छापते. त्यामुळे ही चूक झाली आहे. या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आम्ही गडग आगाराच्या विभागीय नियंत्रकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेवरून बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंद्रगी म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये भाषेबाबतचा वाद नेहमीच चिघळलेला असतो. हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अनेक कन्नड समर्थक गट 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव (कर्नाटक स्थापना दिवस) साजरा करण्याच्या तयारीत आहेत.