राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 11:30 AM2017-08-17T11:30:24+5:302017-08-17T11:31:54+5:30
मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे.
कोटा, दि. 17- मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी लाखो रूपयांचा डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे. प्रवाशांकडील तीन ते पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती मिळते आहे. राजस्थानमधील कोटा येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एक्स्प्रेसच्या एसी-२ टायर आणि एसी-३ टायर अशा नऊ डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक्स्प्रेसमधील 24 प्रवाशांनी त्यांच्याकडील सामान चोरी झाल्याची तक्रार केली आहे. यापैकी अकरा जणांनी निजामुद्दीन जीआरपीकडे चोरी झाल्याची तक्रार केली तर काही जणांनी मथुरा जीआरपीकडे चोरीची तक्रार केल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ
राजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स
प्रवाशांना पदार्थांमधून गुंगीचं औषध दिल्यानंतर झोप लागली. तेव्हा संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बॅगांमधील रोकड आणि दागिने चोरून तेथून पसार झाल्याचं या प्रवाशांनी तक्रारीत म्हंटलं आहे.. काही प्रवाशांची रिकामी केलेली पाकीटं आणि पर्स एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात सापडली, अशी माहितीही त्यांनी दिली.
माझ्याकडील एकुण 21 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरीला गेला. तसंच या एक्स्प्रेसमधील एकुण सात ते आठ कोचेसमध्ये चोरी झाल्याचं समजलं असल्याची माहिती एका प्रवाशाने दिली आहे.
प्रवासादरम्यान बोगीतील सर्व प्रवाशांना अचानक गाढ झोप लागली. झोपेतून उठल्यावर आमच्याकडील पाकीटं आणि मौल्यवान वस्तू गायब झाल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही लगेचच अटेंन्डंटला बोलावलं पण त्यांनी काहीही पाऊल उचलली नाही, असं एका प्रवाशाने म्हंटलं आहे. या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा आयफोन, पासपोर्ट आणि अठरा हजार रूपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे.
याआधीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक्स्प्रेसमधील डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळं घटनांचं प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.